मुंबईचा प्ले आॅफचा मार्ग खडतर

By Admin | Published: May 11, 2015 02:44 AM2015-05-11T02:44:21+5:302015-05-11T02:44:21+5:30

एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्या झंझावाती २१५ धावांच्या भागीदारीने होरपळून निघालेल्या मुंबई इंडियन्सला रविवारी ३९ धावांनी पराभव पत्करावा लागला.

Mumbai's way to play is tough | मुंबईचा प्ले आॅफचा मार्ग खडतर

मुंबईचा प्ले आॅफचा मार्ग खडतर

googlenewsNext

मुंबई : एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्या झंझावाती २१५ धावांच्या भागीदारीने होरपळून निघालेल्या मुंबई इंडियन्सला रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ३९ धावांनी पराभव पत्करावा लागला. लैंडल सिमॉन्स आणि किएरॉन पोलार्ड यांनी झुंजार फलंदाजी करताना मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या; परंतु आवश्यक धावगतीच्या दडपणाखाली आल्याने त्यांचे प्रयत्न अखेर अपुरे ठरले. या पराभवामुळे मुंबईची गुणतालिकेत १२ गुणांसह सहाव्या स्थानी घसरण झाली असून, प्ले आॅफ फेरी गाठण्यासाठी मुंबईचा मार्ग आता अत्यंत खडतर झाला आहे.
नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मुंबईने धोकादायक ख्रिस गेल आणि कोहली यांना जखडवून ठेवत चांगली सुरुवात केली. मात्र, गेल बाद झाल्यानंतर आलेल्या डिव्हिलियर्सने मुंबईकरांची जबरदस्त धुलाई करताना बंगळुरुला निर्धारित २० षटकांत १ बाद २३५ धावांचा हिमालय उभारुन दिला. डिव्हिलियर्स आणि कोहली यांनी नाबाद २१५ धावांची सर्वोच्च भागीदारी रचताना आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम रचला. डिव्हिलियर्सने ५९ चेंडूंत १९ खणखणीत चौकार व ४ षट्कार ठोकताना नाबाद १३३ धावांचा चोप दिला, तर कोहलीनेदेखील वाहत्या गंगेत हात धुताना ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षट्कारांसह ८२ धावा कुटल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये डिव्हिलियर्सची खेळी सर्वोच्च
ठरली.
या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला ७ बाद १९६ अशी मजल मारता आली. चौथ्या षटकात पार्थिव पटेल बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सिमॉन्ससोबत मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला. शर्माने एक चौकार व एक षट्कार मारुन मुंबईकरांमध्ये जोश आणला; परंतु हर्षल पटेलने त्याला बाद करून मुंबईची २ बाद ६३ अशी अवस्था केली.
यावेळी सर्वांच्या नजरा धडाकेबाज किएरॉन पोलार्डवर खिळल्या. पोलार्डनेदेखील चाहत्यांना निराश न करता तुफानी फटकेबाजी करून बंगळुरुच्या तंबूत चिंता निर्माण केली. सिमॉन्सनेदेखील साथीदाराची भूमिका घेताना पोलार्डला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला. पोलार्डने केवळ २४ चेंडूंत ६ चौकार व २ षट्कार खेचताना ४९ धावांचा तडाखा दिला. श्रीनाथ अरविंदने बंगळुरुला मोठे यश मिळवून देताना पोलार्डचा अडसर दूर केला.
यानंतर सिमॉन्सने काही आक्रमक फटके खेळताना झुंजार प्रयत्न केले. मात्र, आवश्यक असलेली धावगती हाताबाहेर जात असल्याचे दडपण आणि ठरावीक अंतराने बाद होणारे फलंदाज यामुळे त्याची झुंज अखेर व्यर्थच ठरली. सिमॉन्सने ५३ चेंडूंत ५ चौकार व ३ षट्कारांसह ६८ धावा काढल्या.
हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर मिचेल स्टार्क व अरविंद यांना प्रत्येकी १
बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)

प्रथम फलंदाजी करणाताना बंगळुरुला मुंबईच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा मोठा फायदा मिळाला. मिचेल मॅक्क्लेनघन टाकत असलेल्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर कर्णधार शर्माने गेलचा झेल सोडला, तर पुढच्याच चेंडूवर मलिंगाने स्लिपमध्ये कोहलीचा सोपा झेल सोडला. यानंतर लगेच गेल बाद झाला. मात्र, कोहलीचा सोडलेला झेल मुंबईला चांगलाच महागात पडला आणि नंतर डिव्हिलियर्सने वादळी शतक झळकावताना कोहलीसोबत मुंबईकरांची जबरदस्त धुलाई केली.

215 ंएबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली या दोघांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून दुसऱ्या विकेटसाठी आज २१५ धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही विकेटसाठी झालेली ही सर्वांत मोठी भागीदारी ठरली आहे.

धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ख्रिस गेल झे. सिमॉन्स गो. मलिंगा १३, विराट कोहली नाबाद ८२, एबी डिव्हिलियर्स नाबाद १३३. अवांतर - ७. एकूण : २० षटकांत १ बाद २३५ धावा. गोलंदाजी : मिचेल मॅक्क्लेनघन ४-०-४०-०, लसिथ मलिंगा ४-१-२७-१, जसप्रीत बुमराह ४-०-५२-०, जगदीश सुचिथ ३-०-३५-०, हरभजन सिंग २-०-३०-०, हार्दिक पांड्या ३-०-५१-०.

मुंबई इंडियन्स : पार्थिव पटेल धावबाद (कोहली/कार्तिक) १९, लैंडल सिमॉन्स नाबाद ६८, रोहित शर्मा झे. मनदीप गो. पटेल १५, किरॉन पोलार्ड झे. स्टार्क गो. अरविंद ४९, हार्दिक पांड्या यष्टिचित कार्तिक गो. चहल ८, अंबाती रायडू झे. डिव्हिलियर्स गो. पटेल १४, हरभजन सिंग झे. कोहली गो. स्टार्क ३, जगदीश सुचिथ झे. कार्तिक गो. चहल ४, मिचेल मॅक्क्लेनघन नाबाद १२. अवांतर - ४. एकूण : २० षटकांत ७ बाद १९६ धावा. गोलंदाजी : मिचेल स्टार्क ४-०-४१-१, श्रीनाथ अरविंद ४-०-२९-१, डेव्हीड वीस ४-०-३८-०, हर्षल पटेल ४-०-३६-२, युजवेंद्र चहल ४-०-५१-२.

Web Title: Mumbai's way to play is tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.