मुंबईचा विजयी ‘चौकार’

By admin | Published: April 17, 2017 01:25 AM2017-04-17T01:25:03+5:302017-04-17T01:25:03+5:30

युवा फलंदाज नितीश राणाच्या तडाखेबंद अर्धशतकानंतर किरॉन पोलार्ड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी निर्णायक क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सलग चौथा विजय

Mumbai's winning streak | मुंबईचा विजयी ‘चौकार’

मुंबईचा विजयी ‘चौकार’

Next

रोहित नाईक, मुंबई
युवा फलंदाज नितीश राणाच्या तडाखेबंद अर्धशतकानंतर किरॉन पोलार्ड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी निर्णायक क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सलग चौथा विजय मिळवत गुजरात लायन्सचा ६ गडी राखून पाडाव केला. गुजरातने दिलेल्या १७७ धावांचे आव्हान मुंबईने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ३ चेंडू राखून पार केले. यांसह पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावताना मुंबईने ८ गुणांची कमाई केली.
वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल जिंकताना मुंबई कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षण स्वीकारले. यंदाच्या सत्रात पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबईकरांनी जबरदस्त सातत्य राखताना सलग चौथा विजय साकारला. त्याचवेळी, पहिले दोन सामने गमावून तिसरा सामना जिंकलेल्या गुजरातला पुन्हा एकदा पराभवास सामोरे जावे लागले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला ४ बाद १७६ धावांवर रोखल्यानंतर मुंबईने चमकदार विजय मिळवला. डावातील दुसऱ्याच चेंडूवर पार्थिव पटेलला बाद करून प्रवीणकुमारने मुंबईला झटका दिला. विशेष म्हणजे प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातलाही डावातील दुसऱ्याच चेंडूवर ड्वेन स्मिथच्या रूपाने धक्का बसला होता. यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजीची सुरुवात सारखीच झाली. मात्र यानंतर राणा आणि जोस बटलर यांनी ५४ धावांत ८५ धावांची भागीदारी करून मुंबईच्या विजयाचा पाया रचला. राणा अर्धशतक झळकावून परतला. त्याने ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. राणानंतर बटलरने काही आक्रमक फटके मारत मुंबईची धावगती कमी होऊ दिली नाही. तसेच, तो बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांनी मुंबईला अखेरपर्यंत विजयी मार्गावर ठेवले. बटलरने २४ चेंडूंत २६ धावा केल्या. पोलार्डने २३ चेंडंूत २ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावांचा तडाखा दिला, तर रोहितने २९ चेंडंूत नाबाद ४० धावांची खेळी करताना ३ चौकार व एक षटकार खेचला. गतसामन्यात हॅट्ट्रिक नोंदवलेल्या अँड्रयूू टायने २ बळी घेतले, मात्र त्याला ४ षटकांत ३४ धावांचा चोप पडला. प्रवीणकुमार, मुनाफ पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. तत्पूर्वी, पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर ब्रँडन मॅक्युलमच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने आव्हानात्मक मजल मारली. त्याने ४४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करताना ६४ धावा केल्या. सुरेश रैना (२८) छोटेखानी फटकेबाजी करून परतल्यानंतर दिनेश कार्तिकने २६ चेंडूंत नाबाद ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून मिशेल मॅक्लेनघनने यशस्वी ठरताना २ बळी घेतले. लसिथ मलिंगा व हरभजन सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

हिटमॅनचे कमबॅक...
या सामन्यात मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरली ती म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा परतलेला फॉर्म. याआधीच्या तिन्ही सामन्यांत सपशेल अपयशी ठरलेल्या रोहितने गुजरातविरुद्ध संयमी सुरुवात करताना जम बसल्यानंतर
मोक्याच्या वेळी फटकेबाजी
केली. हाच फॉर्म त्याने कायम ठेवल्यास पुढील सामन्यात
प्रतिस्पर्धी संघाला मुंबईपुढे खेळणे अत्यंत आव्हानात्मक होईल.

संक्षिप्त धावफलक
गुजरात लायन्स : २० षटकांत ४ बाद १७६ धावा (ब्रँडन मॅक्युलम ६४, दिनेश कार्तिक नाबाद ४८, सुरेश रैना २८; मिशेल मॅक्लेनघन २/२४) पराभूत वि.
मुंबई इंडियन्स : १९.३ षटकांत ४ बाद १७७ धावा (नितीश राणा ५३, रोहित शर्मा नाबाद ४०, किरॉन पोलार्ड ३९; अँड्रयू टाय २/३४)

Web Title: Mumbai's winning streak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.