अभिमानास्पद! मुरली श्रीशंकरने जिंकले रौप्य पदक; भारतीय शिलेदार पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 03:10 PM2023-07-16T15:10:14+5:302023-07-16T15:10:51+5:30
murali sreeshankar world athletics : मुरली श्रीशंकर पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
Asian Athletics Championships : भारतीय ॲथलीट लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये मोठे यश मिळवले आहे. श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.३७ मीटरच्या प्रयत्नात रौप्य पदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली. लक्षणीय बाब म्हणजे या कामगिरीसह तो पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरला आहे.
आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट ठरला. पॅरिसमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी लांब उडीचे अंतर ८.२७ मीटर आहे. खरं तर चायनीज खेळाडूने चौथ्या फेरीत ८.४० मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले, जो या हंगामातील जगातील तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे.
भारताच्या रिले संघाने जिंकले सुवर्ण
दरम्यान, राजेश रमेश, ऐश्वर्या कैलाश मिश्रा, अमोज जेकब आणि सुभा वेंकटेशन यांच्या भारतीय मिश्र ४×४०० मीटर रिले संघाने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. यासोबतच त्यांनी एक नवा राष्ट्रीय विक्रम देखील नोंदवला. भारतीय ॲथलीट अनिल सर्वेश कुशारे आणि स्वप्ना बर्मन यांनी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या चौथ्या दिवशी अनुक्रमे पुरुषांच्या उंच उडी आणि महिलांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत रौप्य पदके जिंकली.
भारताच्या खात्यात पाच पदके
शनिवारी भारताच्या खात्यात पाच पदके आली. यामध्ये एक सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश होता. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मधील भारताची एकूण पदक संख्या सध्या १४ एवढी झाली आहे. यामध्ये सहा सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.