कडक सॅल्युट! भारतीय खेळाडूची ८.३७ मीटर 'झेप', आनंद महिंद्राही झाले फॅन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:04 PM2023-07-17T13:04:57+5:302023-07-17T13:05:32+5:30
murali sreeshankar world athletics : मुरली श्रीशंकर पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
Asian Athletics Championships : भारतीय ॲथलीट लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये त्याने रौप्य पदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली. श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.३७ मीटरच्या प्रयत्नात रौप्य पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे या कामगिरीसह तो पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरला आहे. मुरली श्रीशंकरच्या या लांब उडीने प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील आपलंसं केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी मुरलीचा हा व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.
आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट ठरला. पॅरिसमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी लांब उडीचे अंतर ८.२७ मीटर आहे. खरं तर चायनीज खेळाडूने चौथ्या फेरीत ८.४० मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले, जो या हंगामातील जगातील तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे.
आनंद महिंद्राही झाले फॅन
आनंद महिंद्रा यांनी मुरलीचे कौतुक करताना म्हटले, "थायलंडमधील २५व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये श्रीशंकर मुरलीच्या ८.३७ मीटर झेपमुळे तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात ही किमया साधली. यावेळी तो वाघासारखी डरकाळी फोडत होता. आपण सर्वजण देखील ती झेप घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ती झेप ज्यामुळे आपण सध्या जे काही करत आहे त्यात बदल होऊ शकतो."
Sreeshankar Murali’s 8.37m leap at the 25th Asian Athletics Championships in Thailand qualified him for the Paris Olympics. It was in his final attempt. And he roared like a tiger. We can all try to make that leap—the leap that makes all the difference in whatever we do…… pic.twitter.com/oReujQD2La
— anand mahindra (@anandmahindra) July 17, 2023
भारताच्या रिले संघाने जिंकले सुवर्ण
तसेच राजेश रमेश, ऐश्वर्या कैलाश मिश्रा, अमोज जेकब आणि सुभा वेंकटेशन यांच्या भारतीय मिश्र ४×४०० मीटर रिले संघाने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. यासोबतच त्यांनी एक नवा राष्ट्रीय विक्रम देखील नोंदवला. भारतीय ॲथलीट अनिल सर्वेश कुशारे आणि स्वप्ना बर्मन यांनी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या चौथ्या दिवशी अनुक्रमे पुरुषांच्या उंच उडी आणि महिलांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत रौप्य पदके जिंकली.