श्रीलंका दौऱ्यातून मुरली विजय बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी
By admin | Published: July 17, 2017 04:03 PM2017-07-17T16:03:35+5:302017-07-17T17:51:23+5:30
कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणारा सलामीवीर फलंदाज मुरली विजय दुखपतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिका 3-1ने जिंकल्यानंतर भारतीय संघ 26 जुलैपासून श्रीलंकेविरोधात कसोटी आणि वनडे मालिका खेळण्यासाठी जात आहे. अनिल कुंबळे सोबतचा करार संपल्यानंतर भारतीय संघ नव्या प्रशिक्षकासह श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणारा सलामीवीर फलंदाज मुरली विजय दुखपतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. डॉक्टरांनी विजयला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे मुरली विजयनं श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली आहे. मुरली विजयच्या जागेवर चॅम्पियन्स ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवनची निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले की, अखिल भारतीय निवड समितीने सोमवारी शिखर धवनची दुखापग्रस्त मुरली विजयच्या स्थानी संघात निवड करण्यात आली. भारतीय संघ श्रीलंकेत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. चौधरी यांनी पुढे म्हटले की, विजयला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान मनगटाला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला पुनर्वसन प्रक्रिया कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय वन-डे संघाचा नियमित सदस्य असलेल्या धवनने 23 कसोटी सामन्यांत 38.52 च्या सरासरीने धावा फटकावल्या आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
9 जुलै रोजी लंकेविरोधातील तीन कसोटी सामन्यासाठी 16 सदस्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये के. एल. राहुल आणि रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले आहे. तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेच्या दौ-यात भारतीय संघ तीन कसोटी, 5 वनडे व एक टी-20 सामना खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांसाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 21 व 22 जुलै रोजी हे सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी 26 जुलैपासून कँडी येथे, दुसरी कसोटी 3 ऑगस्टपासून गॅले तर तिसरी व शेवटची कसोटी 12 ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्टपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील एकमेव टी-20 सामना 6 सप्टेंबररोजी कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे.
मायदेशात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही सूत्रे कोणाकडे जातात व नवीन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणेही महत्वाचे ठरेल.
असा आहे भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहीत शर्मा,रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी,कुलदीप यादव आणि अभिनव मुकुंद.
भारतीय संघाचा संपूर्ण श्रीलंका दौरा
कसोटी मालिका -
पहिली कसोटी 26 ते 30 जुलै गॅले
दुसरी कसोटी 3 ते 7 ऑगस्ट कोलंबो
तिसरी कसोटी 12 ते 16 ऑगस्ट पल्लीकल
वनडे मालिका -
पहिली वनडे 20 ऑगस्ट डाम्बुला
दुसरी वनडे 24 ऑगस्ट पल्लीकल
तिसरी वनडे 27 ऑगस्ट पल्लीकल
चौथा वनडे 31 ऑगस्ट कोलंबो
पाचवी वनडे 3 सप्टेंबर कोलंबो
एकमेव टी-20 सामना 6 सप्टेंबर कोलंबो