मॅरेडोनाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर, नर्सिंग टीमविरुद्ध हत्येचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 07:27 AM2021-05-22T07:27:52+5:302021-05-22T07:28:34+5:30
निधनाआधी मॅरेडोनावर ब्रेन सर्जरी करण्यात आली होती. एका आयोगाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या डॉक्टर आणि नर्स यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
ब्यूनस आयर्स : अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे २५ नोव्हेंबर २०२० रोजी वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. याप्रकरणी सरकारी वकिलांनी उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सिंग टीमविरुद्ध हत्येचा आरोप केला आहे.
कायदेशीर कागदपत्रे आणि न्यायालयीन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॅरेडोनाचे खासगी डॉक्टर लियोपोल्डो ल्यूक, मानसोपचार तज्ज्ञ अगास्टिना कोसाचोव्ह आणि अन्य काही नर्सवर हत्येचा आरोप करण्यात आला. या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरविल्यास ८ ते २५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. डीपीएच्या रिपोर्टनुसार सात जणांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना या महिन्याच्या अखेरीस स्वत:चे मत मांडण्यास सांगितले जाणार आहे.
निधनाआधी मॅरेडोनावर ब्रेन सर्जरी करण्यात आली होती. एका आयोगाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या डॉक्टर आणि नर्स यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. टीएन टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार मॅरेडोना यांच्या वैद्यकीय टीमला त्यांच्या खराब प्रकृतीबद्दल माहिती होती. तरीदेखील अपेक्षित वैद्यकीय सुविधा देण्यात आली नाही, त्यामुळे मॅरेडोना यांचे निधन झाले.