मरे तिसऱ्या फेरीत, किर्गियोसची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:29 AM2021-07-02T05:29:18+5:302021-07-02T05:29:44+5:30
नोवाक जोकोविचचा उमदेपणा...
लंडन : ॲन्डी मरे आणि निक किर्गियोस यांनी झुंजारवृत्तीचा परिचय देत दोन सेट गमावल्यानंतरही विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजय संपादन केला. ढोपरावर दोनदा शस्त्रक्रिया आणि त्यानंतर अनेकदा जखमांनी त्रस्त झालेल्या मरेने दुसऱ्या फेरीच्या लढतीत नवखा ऑस्कर ओटी याला ४-६, ४-६, ६-४, ६-२ ने पराभूत केले. सामन्यादरम्यान तो दोनदा कोर्टवर पडला. ऑस्ट्रेलियाच्या किर्गियोसने २१वा मानांकित युगो हम्बर्टचा ६-४, ४-६, ३-६, ६-१९-७ ने पराभव केला. रात्रीच्या संचारबंदीमुळे हा सामना बुधवारी (दि. ३०) पूर्ण होऊ शकला नव्हता. याशिवाय दोन दिवसांच्या पावसामुळे किमान सहा सामने तिसऱ्या दिवशी आटोपण्यात आले.
१९ वेळेचा ग्रॅन्डस्लॅम चॅम्पियन नोवाक जोकोविच हादेखील तिसऱ्या फेरीत दाखल झाला. त्याने केविन ॲन्डरसनवर ६-३, ६-३, ६-३ ने मात केली. तिसरी फेरी गाठणाऱ्या अन्य खेळाडूंमध्ये फ्रान्सिस टिफोऊ, सॅबेस्टियन कोर्डा, फॅबियो फोगनिनी, सलोनी स्टीफन्स यांचा समावेश आहे.
नोवाक जोकोविचचा उमदेपणा...
उदय बिनिवाले
लंडन : विक्रमी ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी सर्बियाचा नोवाक जोकोविचने बुधवारी विम्बल्डनचा दुसरा सामना जिंकला. यानंतर पत्रकार परिषदेत तो उपस्थित झाला. आयोजकांनी इंग्रजीत तीन किंवा चार प्रश्न विचारावेत, तसेच नंतर सर्बियन भाषेत प्रश्न विचारले जातील, अशी सूचना केली.
नोवाकने मात्र मध्ये हस्तक्षेप करीत, ‘इंग्रजीत प्रश्न विचारणारे बरेच हात वर दिसत असून, ते नाराज जाणवतात, त्यांनाही प्रश्न विचारू द्या’, असे सांगितले. यामुळे इंग्रजीत आणखी प्रश्न विचारण्यात आले. यामुळे जोकोविचने मात्र उपस्थितांची मने जिंकली. दर्जेदार खेळासोबतच मनाचा प्रचंड मोठेपणा असलेला खेळाडू जोकोविचच्या रूपाने पाहायला मिळाला. महान नोवाकच्या खेळाडूवृत्तीला सलाम!
टेनिसयुद्ध अवर्णनीय : सबालेंका
n बेलारूसची दुसरी मानांकित आर्यना सबालेंका हिने अपेक्षेनुसार सेंटर कोर्टवर विजय साजरा केला. ती म्हणाली, ‘येथे पहिल्यांदा खेळतेवेळी प्रचंड दडपणाखाली आणि भावुक होते.
n अनुभवाच्या बळावर खेळात विविधता आणून विजयावर शिक्कामोर्तब केले. हे अवर्णनीय असे टेनिसयुद्ध आहे. या संपूर्ण वातावरणाचा आम्ही पुरेपूर आनंद घेत आहोत.