मरे, अजारेंका, मुगुरुजाने गाठली तिसरी फेरी

By admin | Published: January 22, 2016 03:00 AM2016-01-22T03:00:24+5:302016-01-22T03:00:24+5:30

ब्रिटनचा अनुभवी खेळाडू अँडी मरे, बेलारुसची स्टार टेनिसपटू व्हिक्टोरिया अजारेंका, स्पेनची गारबाईन मुगुरुजा यांनी आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आपले विजयी

Murray, Azarenka, Mujiruje reached the third round | मरे, अजारेंका, मुगुरुजाने गाठली तिसरी फेरी

मरे, अजारेंका, मुगुरुजाने गाठली तिसरी फेरी

Next

मेलबर्न : ब्रिटनचा अनुभवी खेळाडू अँडी मरे, बेलारुसची स्टार टेनिसपटू व्हिक्टोरिया अजारेंका, स्पेनची गारबाईन मुगुरुजा यांनी आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आपले विजयी अभियान कायम राखत तिसऱ्या फेरीत धडक मारली. अन्य लढतीत फ्रान्सचा विल्फ्रेड त्सोंगा, कॅनडाचा मिलोस राओनिक यांनी आगेकूच केली. मात्र अमेरिकेच्या राजीव रामला पराभवाचा सामना करावा लागला.
ब्रिटनच्या अँडी मरे याने पुरुष गटात एकेरी लढतीत आॅस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथला ६-०,६-४, ६-१ अशी धूळ चारली. तिसऱ्या फेरीत मरेचा सामना पोर्तुगालच्या जोओ सोसा याच्याशी होईल. फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाने जबरदस्त कामगिरी करताना आॅस्ट्रेलियाच्या ओमर जेसिका विरुद्ध दुसऱ्या फेरीच्या लढतीत ७-५, ६-१, ६-४ असे हरवून आगेकूच केली.
पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत अमेरिकेच्या राजीव राम याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला फ्रान्सच्या स्टिफन रॉबर्ट याच्याकडून पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात ६-१, ६-७, ४-६, ७-५, ७-५ अशी मात खावी लागली. कॅनडाच्या मिलोस राओनिक याने स्पेनच्या टॉमी रॉबरेडोवर ७-६, ७-६, ७-५ विजय मिळविला. अमेरिकेच्या जॉन इस्नरने स्पेनच्या मार्सेलो ग्रेनोलर्सचा ६-३, ७-६, ७-६ अशा फरकाने पराभव केला. फ्रान्सच्या गाएल मोफिल्सने आपल्याच देशाच्या निकोलस महुत याचे ७-५, ६-४, ६-१ असे आव्हान मोडून काढताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महिला गटात व्हिक्टोरिया अजारेंका आणि गारबाईन मुगुरुजा यांनी अंतिम १६ खेळाडूंत जागा पक्की केली. मुगुरुजाने बेल्जियमच्या कस्टर्न फ्लिपकेंसवर ६-४, ६-२ अशी सरशी साधून तिसरी फेरी गाठली.
अन्य सामन्यांत १८ वर्षीय जपानची क्वालिफायर ओसाका हिने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनावर ६-४, ६-४ अशी सरशी साधली. विशेष म्हणजे ओसाका पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या मुख्य फेरीत खेळत आहे. आता ओसाका हिचा पुढच्या फेरीचा सामना बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंका हिच्याशी होणार आहे.
अमेरिकेच्या मॅडिसन की हिने कजाकिस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेडोव्हावर ६-७, ६-३, ६-३ ने विजय मिळविला, तर सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविच हिने लात्वियाच्या अनास्तासिजा सेवास्तोव्हावर ६-३, ६-३ अशी सहज मात केली. मात्र, माजी नंबर वन खेळाडू आणि १९ वे मानांकनप्राप्त सर्बियाच्या जेलेना जांकोविच हिला दुसऱ्या फेरीच्या लढतीत लॉरा सीजमडकडून ३-६, ७-६, ६-४ अशी मात खावी लागली.
२०१४ मध्ये स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने झेक प्रजासत्ताकच्या रादेक स्टेपानेकवर ६-२, ६-३, ६-४ अशी मात करीत तिसरी फेरी गाठली. पुढच्या फेरीत आता वावरिंकाचा सामना अमेरिकेचा जॅक सॉक आणि झेक प्रजासत्ताकचा लुकास रोसोल यांच्यात होणाऱ्या लढतीतील विजेत्याशी होईल.
>> सानिया, हिंगीस दुसऱ्या फेरीत
दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस यांनी आपला विजयी धडाका कायम राखताना आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सानिया आणि हिंगीस यांचा हा सलग ३१ वा विजय ठरला. अव्वल मानांकनप्राप्त या जोडीने कोलंबियाच्या मरियाना डुकू मारिनो आणि ब्राझीलची तेलियाना परेरा या बिगरमानांकित जोडीचा ६-२, ६-३ असा पराभव केला.
जवळपास ७० मिनिटांपर्यंत चाललेल्या या लढतीत सानिया आणि हिंगीस यांना विजय मिळविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. विजयी जोडीला आता पुढच्या सामन्यात युक्रेनची नादिया किचेनोक आणि युडमिला किचेनोक यांच्याशी झुंज द्यावी लागेल.
जंटलमन त्सोंगाचे प्रेक्षकांकडून कौतुक
आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष गटातील दुसऱ्या फेरीत एका बॉल गर्लची मदत करणाऱ्या फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
आॅस्ट्रेलियाच्या ओमर जेसिका विरुद्धच्या लढतीदरम्यान एका बॉल गर्लला अस्वस्थ वाटू लागले. हे लक्षात येताच त्सोंगाने आपला खेळ मध्येच सोडून सदर मुलीकडे धाव घेत तिला मदत केली. यानंतर कोर्टवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्सोंगाचे स्वागत केले. स्पर्धा आयोजकांनी सांगितले की, सध्या या बॉल गर्लची प्रकृती ठीक आहे.
भारताच्या रोहन बोपन्नाची आगेकूच
भारताच्या रोहन बोपन्ना याने रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मर्जियासह आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरी लढतीत शानदार विजय मिळविला. बोपन्ना आणि मर्जिया या जोडीने पहिल्या फेरीत उत्कृष्ट कामगिरी करताना आॅस्ट्रेलियाचा उमर जेसिका आणि निक किर्गियोस यांच्यावर ७-५, ६-३ अशा फरकाने विजय मिळविला.
लेटन हेविटचा अलविदा
आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीच्या
सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या लेटन हेविटला
पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर हेविटने टेनिसला अलविदा केले. ३४ वर्षीय हेविटला एकेरी लढतीत स्पनेच्या डेव्हिड फेररकडून २-६, ४-६, ४-६ अशी मात खावी लागली. जागतिक क्रमवारीत ३०८ व्या क्रमांकावर घसरलेला हेविट पुरुष दुहेरीत मात्र खेळणार आहे. स्पर्धेत सॅम ग्रोथ त्याचा जोडीदार आहे.

Web Title: Murray, Azarenka, Mujiruje reached the third round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.