मरे, हालेपची आगेकूच
By admin | Published: June 6, 2017 05:02 AM2017-06-06T05:02:47+5:302017-06-06T05:02:47+5:30
सिमोना हालेप यांनी सोमवारी सहज विजयाची नोंद करताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली
पॅरिस : जागितक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अँडी मरे व महिला विभागात जेतेपदाची प्रबळ दावेदार सिमोना हालेप यांनी सोमवारी सहज विजयाची नोंद करताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
ब्रिटनचा खेळाडू मरेने रशियाच्या कारेन खाचनोव्हचा ६-३, ६-४, ६-४ ने पराभव केला. मरेला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आठवे मानांकन प्राप्त जपानचा केई निशिकोरी व स्पेनचा फर्नांडो वर्डास्को यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
महिला विभागात २०१४ ची उपविजेती व तिसरे मानांकन प्राप्त हालेपने २१ व्या मानांकित स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारोचा ६-१, ६-१ ने सहज पराभव केला. सेरेना विलियम्स व मारिया शारापोव्हा यांच्या अनुपस्थितीत व अव्वल मानांकित एंजलिक कर्बर पहिल्याच फेरीत गारद झाल्यानंतर हालेप जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. हालेपला स्पेनच्या खेळाडूविरुद्ध विजय मिळविताना विशेष घाम गाळावा लागला नाही.
उपांत्यपूर्व फेरीत हालेपला युक्रेनच्या पाचव्या मानांकित इलिना स्वितोलिनाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्वितोलिनाने जागतिक क्रमवारीत २९० व्या स्थानावर असलेल्या पेट्रा मार्टिकची झुंज ४-६, ६-३, ७-५ ने मोडून काढली.
पात्रता फेरीचा अडथळा पार करीत मुख्य फेरीत स्थान मिळवणारी मार्टिक तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये एकवेळ ५-२ ने आघाडीवर होती. तिला उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची चांगली संधी होती, पण स्वितोलिनाने सलग पाच गेम जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
मरेने विजयानंतर अलीकडे लंडन व मँचेस्टर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या २९ व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. मरे म्हणाला, ‘लंडनमध्ये आणि त्यापूर्वी सहा-सात दिवसआधी
मँचेस्टरमध्ये दु:खद घटना घडल्या. पॅरिसलाही अलीकडच्या कालावधीमध्ये समस्यांना सामोरे जावे लागले आहे. यासंदर्भात प्रत्येक व्यक्ती माझ्यासोबत असेल, अशी आशा आहे.’
>सानिया मिश्र दुहेरीच्या
उपांत्यपूर्व फेरीत
सानिया मिर्झाने क्रोएशियाचा सहकारी इव्हान डोडिगच्या साथीने फ्रेंच ओपन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सानिया-डोडिग जोडीने युक्रेनच्या एलिन स्वितोलिना व न्यूझीलंडचा एर्टेम सिटेक जोडीचा दुसऱ्या फेरीच्या लढतीत ६-२, ६-४ ने पराभव केला. रोहन बोपन्ना व उरुग्वेचा पाब्लो क्युवास यांना पुरुष दुहेरीमध्ये ब्रिटनच्या जेमी मरे व ब्राझीलचा ब्रुनो सोरेज या जोडीविरुद्ध ६-७, २-६ ने पराभव स्वीकारावा लागला. पूरव राजा व दिविज शरण या भारतीय जोडीला पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या रेयान हॅरिसन व न्यूझीलंडचा मायकल व्हीनस यांच्याविरुद्ध ६-४, ६-७, २-६ ने पराभव स्वीकारावा लागला. मुलींच्या एकेरीमध्ये झील देसाई हिला पहिल्या फेरीत डेनियला विसमेनविरुद्ध ०-६, २-६ ने पराभव पत्करावा लागला. मुलांच्या एकेरीमध्ये अभिमन्यू वाणेमरेड्डी याचा पहिल्या फेरीत फ्रान्सच्या क्लेमेंट ताबुरविरुद्ध
०-६, १-६ ने पराभव झाला.