उत्कृष्ट रँकिंगचे खेळाडू असावेत
By admin | Published: September 24, 2015 11:42 PM2015-09-24T23:42:25+5:302015-09-24T23:43:11+5:30
भारताला डेव्हिस चषकाच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर संघात उत्कृष्ट रँकिंग असलेल्या खेळाडूंनाच खेळविण्याची गरज असल्याचे मत माजी टेनिस दिग्गज विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : भारताला डेव्हिस चषकाच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर संघात उत्कृष्ट रँकिंग असलेल्या खेळाडूंनाच खेळविण्याची गरज असल्याचे मत माजी टेनिस दिग्गज विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.
१०० अथवा ५०च्या बाहेर रँकिंग असलेल्या खेळाडूंसोबत डेव्हिस चषकाच्या ‘प्ले आॅफ’मधूनही भारताला बाहेर पडता येणार नाही, असे ६१ वर्षांचे अमृतराज यांना वाटते. भारताला विश्व प्ले आॅफमध्ये नुकताच चेक प्रजासत्ताकाकडून १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर भारतीय संघ पुन्हा आशिया ओशेनिया ग्रुप एकमध्ये परतला आहे. विशेष असे की, भारताकडे सध्या आघाडीच्या १०० जणांमध्ये असलेले रँकिंग खेळाडू नाहीतच. युकी भांबरीची क्रमवारी १२५, तर सोमदेव १६६ व्या स्थानावर आहे. अमृतराज पुढे म्हणाले, ‘सोमदेवने वेस्लीला पहिल्या दिवशी नमविले तेव्हा मी फार आनंदी होतो; पण दुसऱ्या दिवशी निराशा पदरी पडली. चेक संघ विश्व क्रमवारीत नंबर वन आहे, तर भारत २१ व्या स्थानावर येतो. अशावेळी विश्व ग्रुपमध्ये पोहोचणे स्वप्नवत होते. अशा कामगिरीसाठी १००च्या आत रँकिंग असलेल्या खेळाडूंची गरज असते.’
आघाडीच्या १०० खेळाडूंमध्ये रँकिंग असेल, तरच टॉमस बेर्डीच किंवा मरे यांच्या सारख्या खेळाडूंना पराभूत करण्याचा विचार केला जाऊ शकतो. आमच्याकडे युकी किंवा सोमदेव यांच्यापेक्षाही सरस खेळाडू असावेत. त्यासाठी स्वित्झर्लंड किंवा स्पेनसारखा युवा अवस्थेत खेळाडूंचा शोध घ्यायला हवा. आठ- दहा वर्षांत एक खेळाडू मिळतो, हे भारतीय टेनिसला साजेसे नाही. दरम्यान, अमृतराज यांनी सानियाची प्रशंसा केली. सानिया ही चांगली कामगिरी करीत असून, मार्टिना हिंगीससोबत तिचा ताळमेळ चांगला असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)