माझी स्पर्धा स्वत:शीच आहे
By admin | Published: March 3, 2017 12:33 AM2017-03-03T00:33:39+5:302017-03-03T00:33:39+5:30
संघात स्थान मिळविण्यासाठी मला कोणाविरुद्ध स्पर्धा करावी लागेल, याचा मी माझ्या कारकिर्दीमध्ये कधीच विचार केला नाही.
नवी दिल्ली : संघात स्थान मिळविण्यासाठी मला कोणाविरुद्ध स्पर्धा करावी लागेल, याचा मी माझ्या कारकिर्दीमध्ये कधीच विचार केला नाही. जर हाच विचार कायम करत राहिलात, तर एक खेळाडू म्हणून तुम्ही कधीच प्रगती करू शकणार नाही. माझी स्पर्धा स्वत:शीच असून ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत, अशा गोष्टींचा मी विचार करीत नाही,’ असे वक्तव्य भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने केले.
दुखापतीमुळे गेल्या चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर विजय हजारे आंतरराज्य एकदिवसीय स्पर्धेतून रोहित पुनरागमन करीत आहे. रोहितचे मुख्य लक्ष्य टीम इंडियात पुनरागमनाचे असले, तरी सध्या त्याला आपलाच मुंबईकर सहकारी अजिंक्य रहाणे आणि कर्नाटकाच्या करुण नायरविरुद्ध कडवी टक्कर मिळणार आहे. रोहितने आपल्या मागील ३ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये नाबाद ६८, ८२ आणि नाबाद ५१ धावा अशा खेळी केल्या आहेत.
आगामी ४ आणि ६ मार्च रोजी होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रोहित मुंबईकडून खेळताना आपली तंदुरुस्ती सिद्ध करेल. त्याने सांगितले, की सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये मी भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. मात्र, यासाठी पुन्हा एकदा मला नव्याने सुरुवात करावी लागेल.’’ त्याचप्रमाणे, ‘मी स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे अनुभवत आहे. मात्र, असे असले, तरी नेहमी काही चेंडूंना सामोरे जाणे आवश्यक असते आणि त्यानंतरच पुढे जाणे योग्य ठरते,’ असेही रोहितने सांगितले. (वृत्तसंस्था)
एकीकडे राष्ट्रीय संघ पारंपरिक लाल चेंडूने खेळत असताना दुसरीकडे रोहित सफेत चेंडूने खेळत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय संघात पुनरागमन करणे रोहितपुढे आव्हान ठरेल. मात्र, रोहितने बंगळुरू येथील एनसीएमधील नेट सरावादरम्यान एक दिवस लाल आणि त्यानंतर सफेत चेंडूने कसून सराव केला. याविषयी रोहित म्हणाला, ‘‘हे सोपे नव्हते; परंतु सराव संतुलित ठेवण्यासाठी मी दोन्ही चेंडूंनी सराव केला. दोन्ही चेंडूंनी सराव करताना वेगळा अनुभव आला.’’
मी फलंदाज म्हणून मुंबईच्या डावाची सुरुवात करेन; मात्र कर्णधाराची भूमिका नाही बाजवणार. आदित्य तरेने पूर्ण मोसमात कर्णधार म्हणून शानदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर, मोठ्या कालावधीनंतर मी मुंबईकडून खेळण्यासाठी पुनरागमन करणार आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व करणे योग्य ठरणार नाही. सध्या मुंबईला दोन्ही सामन्यांत विजय मिळविणे आवश्यक असून तेच माझे मुख्य लक्ष्य आहे. चांगली खेळी करून मुंबईला विजयी करण्याचा माझा निर्धार आहे.- रोहित शर्मा
आपल्या पुनरागमनाविषयी रोहित पुढे म्हणाला, ‘‘संघात पुनरागमनाबाबत उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यास मी मानसिकरीत्या सज्ज आहे. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही गोष्टींची चिंताही आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी योग्य पुनर्वसन प्रक्रियेचा अवलंब केल्यास साडेतीन-चार महिन्यांत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात येऊ शकतो, असा विश्वास दिला. असे असले, तरी हा काळ सर्वांत कठीण काळ असतो. कारण यादरम्यान आपल्याला आपल्या सर्वांत आवडत्या गोष्टी करता येत नाहीत.’’