‘त्यांच्या’ रडीच्या डावाला माझे ‘सुवर्ण’ उत्तर - राहुल आवारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:11 AM2018-05-07T01:11:33+5:302018-05-07T01:11:33+5:30
रिओ आॅलिंपिक’ स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाने केलेल्या अन्यायाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उत्तर दिले आहे़ आता आॅगस्टमध्ये एशियन गेम्स आणि २०२० मध्ये टोकियो आॅलिम्पिक होत आहे़ दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारच, असा निर्धार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
- साहेबराव नरसाळे
अहमदनगर - ‘रिओ आॅलिंपिक’ स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाने केलेल्या अन्यायाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उत्तर दिले आहे़ आता आॅगस्टमध्ये एशियन गेम्स आणि २०२० मध्ये टोकियो आॅलिम्पिक होत आहे़ दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारच, असा निर्धार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला़
रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाताना राहुल नगरमध्ये थांबला होता़ २०१६ मध्ये रिओ आॅलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने सर्व प्रतिस्पर्धी मल्लांवर मात करीत सहभागावर आपला हक्क सांगितला होता़ मात्र, भारतीय कुस्ती महासंघाने त्याला डावलून हरियाणाच्या संदीप तोमरची निवड केली होती़ तसेच राहुलवर बंदी घालण्याची धमकीही दिली होती़ त्यावरुन महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात मोठे वादळ उठले होते़ २०१६ च्या वादानंतर राहुल प्रथमच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात उतरला होता़ त्यामुळे राहुलच्या कुस्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या़ राष्ट्रकुलमध्ये ५७ किलो वजनगटात राहुलने सुवर्णपदक पटकावले़
२०१६ साली माझ्यावर अन्याय झाला़त्यानंतर पुन्हा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे माझ्यासाठी खूप अवघड होते़ त्या अन्यायाला उत्तर देण्यासाठीच मी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने उतरलो होतो़ मागील विसरुन पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे़ आॅगस्ट २०१८ मध्ये एशियन गेम्स स्पर्धा होत आहेत़ त्याची तयारी सुरू आहे़ पुढील महिन्यात जॉर्जिया येथे प्रशिक्षणासाठी जात आहे़ त्यानंतर सोनीपत येथे कुस्ती प्रशिक्षण शिबिर आहे, असे राहुलने सांगितले.