हे माझे अखेरचे आॅलिम्पिक

By admin | Published: June 28, 2016 06:21 AM2016-06-28T06:21:31+5:302016-06-28T06:21:31+5:30

रिओ आॅलिम्पिक माझ्यासाठी अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा असेल; मात्र या वेळी मी देशासाठी किमान कांस्यपदक नक्की पटकावेन

This is my last Olympics | हे माझे अखेरचे आॅलिम्पिक

हे माझे अखेरचे आॅलिम्पिक

Next


नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिक माझ्यासाठी अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा असेल; मात्र या वेळी मी देशासाठी किमान कांस्यपदक नक्की पटकावेन, असा विश्वास बॉक्सर विकास कृष्णन याने व्यक्त केला.
कोच जगदीप हुडा यांच्यासह प्रसारमाध्यमांशी बोलताना विकास म्हणाला, ‘‘यंदाची आॅलिम्पिक माझी अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर माझ्या परिवारासह मला वेळ घालवायचा आहे. त्याचबरोबर, देशात बॉक्सिंगच्या प्रगतीसाठीही काम करू इच्छितो.’’ २४ वर्षीय विकासने नुकत्याच बाकू (अझरबैजान) येथे झालेल्या आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्य पटकावून रिओचे तिकीट निश्चित केले. उपांत्यपूर्व फेरीत डोळ्यांच्या वरच्या बाजूला दुखापत झाल्यानंतरही उपांत्य फेरी गाठलेल्या विकासने दिमाखात आॅलिम्पिक प्रवेश केला. मात्र, दुखापतीमुळे तो या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळू शकला नव्हता. रिओ आॅलिम्पिकमध्ये ७५ किलोगटातील पदकाच्या अपेक्षाविषयी तो म्हणाला, ‘‘मी देशासाठी पदक नक्की जिंकेन, इतकेच सध्या सांगू शकतो. तरीही, सर्व काही मिळणाऱ्या ड्रॉवर अवलंबून आहे. तरीही किमान कांस्यपदकाची मला पूर्ण अपेक्षा आहे. यासाठी मला दोन फाइट जिंकाव्या लागतील.’’ त्याच वेळी कोच जगदीश यांनी मात्र, ‘‘विकासमध्ये सुवर्ण जिंकण्याची क्षमता आहे, असे सांगितले.’’(वृत्तसंस्था)
>प्रोफेशनल आणि हौशी यांपैकी कोणत्या बॉक्सिंगला पसंती देशील, यावर विकास म्हणाला, ‘‘सध्या याचा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण आहे. माझे लक्ष्य भारतीय बॉक्सिंगला यशाच्या शिखरावर नेण्याचे आहे. आॅलिम्पिकनंतर मी हेच लक्ष्य साधण्याचा प्रयत्न करणार आहे.’’
लंडन आॅलिम्पिकमध्ये १३-११ अशा गुणांनी विजयी झाल्यानंतरही अमेरिकेच्या बॉक्सरने केलेल्या अपीलमुळे विकासला पराभवाला सामोरे जावे लागले.
या धक्कादायक प्रकाराने विकास इतका निराश झाला होता, की तब्बल दीड वर्षापर्यंत तो बॉक्सिंगपासून दूर राहिला. मात्र, बॉक्सिंगवरील प्रेमामुळे पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरल्यानंतर २०१४मध्ये आशियाई स्पर्धेत कांस्य व २०१५च्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदकांची कमाई त्याने केली. सध्या विकास जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे.
>..तर व्हेनेझुएला स्पर्धेत विकास उतरला असता
जर बाकू स्पर्धेत आॅलिम्पिकचे तिकीट मिळविण्यात अपयश आले असते, तर विकास व्हेनेझुएला येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळला असता. याआधी आयबा प्रो नाइट खेळलेल्या विकासला या स्पर्धेचे निमंत्रणही मिळाले होते; मात्र नियमांप्रमाणे तो ही स्पर्धा खेळू शकत नव्हता. पण त्याच वेळी आपला सराव अधिक मजबूत करण्यासाठी विकास प्रो बॉक्सरविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.

Web Title: This is my last Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.