कुंबळे-कोहली यांच्यातील रहस्यमय मतभेद
By admin | Published: June 22, 2017 01:24 AM2017-06-22T01:24:50+5:302017-06-22T01:32:35+5:30
मंगळवारचा दिवस नाट्यपूर्ण घटनांनी भरलेला पण भारतीय क्रिकेटसाठी दु:खदायकच होता. त्या दिवशी अनिल कुंबळे हे क्रिकेट संघाचे कोच या नात्याने पायउतार झाले
- अयाझ मेमन
मंगळवारचा दिवस नाट्यपूर्ण घटनांनी भरलेला पण भारतीय क्रिकेटसाठी दु:खदायकच होता. त्या दिवशी अनिल कुंबळे हे क्रिकेट संघाचे कोच या नात्याने पायउतार झाले. त्यामुळे सगळा विचका झाला. या घटनेची अर्धवट माहितीच आजवर उपलब्ध आहे.
भारतीय क्रिकेट चमूूने कोच म्हणून स्वीकृती दिल्याशिवाय अनिल कुंबळे वेस्ट इंडिजला जातील हे मी अपेक्षितच केले नव्हते. त्यातही कर्णधार विराट कोहली यांची संमती मिळणे आवश्यक होते. कोहलीची संमती काही अटींसह होती कारण त्याविना ते निष्प्रभ ठरले असते. पण त्या अटींना मान्यता मिळाली नाही. माझ्या माहितीप्रमाणे याच आठवड्यात सुरू होत असलेल्या वेस्ट इंडिजचा दौरा पूर्ण होईपर्यंत अनिल कुंबळे यांचा कालावधी वाढविण्याची तयारी सी.ए.सी. आणि बी.सी.सी.आय.ने केली होती. त्या दौऱ्यानंतर आणखी मुदतवाढ मिळते का हेही बघितले जाणार होते. पण हे सगळे कल्पनेतच होते. कारण कुंबळे यांच्यासारखी व्यक्ती अशातऱ्हेच्या अटी स्वीकारणे शक्यच नव्हते. सगळेजण वेळकाढूपणा करीत होते. पण तसे करताना कुंबळे यांची कोंडी केली जात होती.
कोहलीने बी.सी.सी.आय.च्या अधिकाऱ्यांना खासगीत सांगितले होते की, कुंबळे यांची काम करण्याची पद्धत त्यांना पसंत नाही. अशा स्थितीत काम करणे आपल्याला अशक्य झाले होते ही माहिती कुंबळेंनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली होती. क्रिकेट सल्लागार समितीचे (सी.ए.सी.) तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मण यांनासुद्धा कुंबळे व कोहली यांच्यात तडजोड करणे जमले नव्हते. त्यावरून त्या दोघांमधील संबंध किती ताणले गेले होते याची कल्पना येते.
क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्यसुद्धा त्यांना पसंत नसलेल्या प्रशिक्षकांच्या विरोधात उभे ठाकल्याच्या घटना पूर्वी घडलेल्या आहेत. त्यात कुंबळे देखील होते. पण कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातून निवड करण्याचा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा कर्णधाराचाच विजय होत असतो. कर्णधार जर कमकुवत असेल तर गोष्ट वेगळी! फुटबॉल, हॉकी, रणजी या खेळात प्रशिक्षक किंवा व्यवस्थापक यांना महत्त्वाचे स्थान असते. पण क्रिकेटमध्ये कर्णधाराचाच वरचष्मा असतो. क्रिकेटच्या मैदानात कर्णधारच निर्णायक असतो तोच बॉससुद्धा असतो.
आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या भूमिकांच्या मर्यादा मान्य केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की कर्णधार आणि आपल्यामध्ये असलेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न बी.सी.सी.आय.ने केला होता. पण या दोघांचे पटू शकत नाही हे बी.सी.सी.आय.ने कुंबळे यांच्यापाशी सोमवारी उघड केले याचे मला आश्चर्य वाटले. कारण जर कर्णधाराने कुंबळेविषयीचे आपले मत पूर्वीच उघड केलेले होते तर बी.सी.सी.आय.ने त्याची जाणीव कुंबळेंना करून द्यायला हवी होती. कारण त्यांची नेमणूक बी.सी.सी.आय.ने केली होती. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील मतभेद सर्वांना ठाऊक होते. मग ते भलेही अधिकृतपणे स्पष्ट केले गेले नव्हते! रामचंद्र गुहा यांनी आपल्या राजीनामापत्रात त्याचा उल्लेख केला होता आणि त्यावरून तीन महिन्यांपासून या कुरबुरी सुरू होत्या असे दिसते. कुंबळे यांनाही त्याची भनक लागली असावी. बी.सी.सी.आय.ने शालीनपणा दाखवून त्याबाबत कुंबळे यांचेशी चर्चा करायला हवी होती. चॅम्पियन करंडक सामने संपायची वाट पाहण्याची गरज नव्हती. पण मध्यंतरीच्या काळात बोर्डाने प्रमुख प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. त्यावरून कुंबळे आणि कोहली यांच्यात दिलजमाई घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बोर्डाने कुंबळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असे दिसते.
आॅस्ट्रेलियाविरुद्धचे सामने आणि चॅम्पियन्स करंडक सामने यांच्या दरम्यानच्या काळात परिस्थिती अधिकच बिघडली. हे सगळे बी.सी.सी.आय.ला आणि सी.ओ.ए. ला (रामचंद्र गुहा यांनी ते अधिक स्पष्ट केले.) ठाऊक होते. पण सी.ए.सी.ला (तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण) मात्र ते अलीकडे समजले.
कुंबळे पायउतार झाल्यावर बोर्डाने अधिकृत पत्रक काढून कुंबळेची प्रशंसा केली आणि ‘भारतीय क्रिकेटला त्यांची गरज लागेल’ असे स्पष्ट केले. याचा अर्थ त्यांचा ‘डायरेक्टर आॅफ क्रिकेट आॅपरेशन्स’ या पदासाठी विचार केला जाईल का? निदान सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सी.ओ.ए. (कमिटी आॅफ अॅडमिनिस्ट्रेटर्स) चे सदस्य म्हणून घेण्याचा विचार करावा. कारण या समितीची स्थिती सध्या नाजुक झाली आहे. पण या दोघांमधील मतभेद एवढ्या पराकोटीस कसे पोचले याचा खुलासा होत नाही. एकजण व्हिलन आहे आणि दुसरा बळी ठरला आहे असे म्हणून भागणार नाही. क्रिकेटचा एक प्रेमी या नात्याने मला हे प्रकरण अत्यंत दु:खद वाटते. पण जीवनाचा अभ्यासक या नात्याने जी भागीदारी अत्यंत चांगली वाटत होती ती अचानक कोसळावी याचे मला रहस्यही वाटते.
कोहली आणि कुंबळे या दोघांनीही भारतीय क्रिकेटचा लौकिक वाढविला आहे. त्या दोघांनी परस्परांपासून वेगळे होणे हे मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीचेच दर्शन घडविते.