एन. रामचंद्रनला सोसावी लागली टीका
By admin | Published: December 17, 2015 01:28 AM2015-12-17T01:28:55+5:302015-12-17T01:28:55+5:30
या वर्षी जोशना चिनप्पा हिने दीपिका पल्लिकल हिला मागे टाकत भारताची सर्वोत्तम रँकिंग असणारी खेळाडू ठरली, तर कोर्टच्या बाहेर एन. रामचंद्रन यांना विश्व स्क्वॉश म
नवी दिल्ली : या वर्षी जोशना चिनप्पा हिने दीपिका पल्लिकल हिला मागे टाकत भारताची सर्वोत्तम रँकिंग असणारी खेळाडू ठरली, तर कोर्टच्या बाहेर एन. रामचंद्रन यांना विश्व स्क्वॉश महासंघाचे (डब्ल्यूएसएफ) अध्यक्ष म्हणून कठोर टीकेचा सामना करावा लागला.
रामचंद्रन यांना डब्ल्यूएसएफ आणि भारतीय आॅलिम्पिक महासंघ (आयओए) या दोन्ही अध्यक्षांच्या रूपात टीकेचा सामना करावा लागला. योगायोगाने याच वर्षी त्यांचे भाऊ एन. श्रीनिवासन यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतून हटवण्यात आले.
स्क्वॉश खेळाला आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देऊ न शकल्यामुळे रामचंद्रन यांच्यावर कठोर शब्दात टीका करण्यात आली. स्वदेशात महासंघातील भारताच्या काही सदस्यांनी तर त्यांना आयओएप्रमुख पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही त्यांचे पद कायम ठेवण्यात कसेबसे यशस्वी ठरले.
वर्षाच्या सुरुवातीला पुरुष व्यावसायिक संघटना पीएसए आणि महिला संघटना डब्ल्यूएसए यांचे विलीनीकरण झाले. कोर्टवर जोशना भारताच्या तीन प्रमुख खेळाडूंत सर्वाधिक यशस्वी ठरली. तिच्याशिवाय दीपिका आणि सौरव घोषाल हे भारतीय स्क्वॉशमधील प्रसिद्ध चेहरे आहेत. जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू रानीम एल. वेलिली हिला कतार क्लासिकमध्ये पराभूत करणे हा जोशनासाठी वर्षातील अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण ठरला. मेलबोर्न आणि मुंबई येथील स्पर्धेत १५ हजार डॉलर बक्षीस रकमेचे दोन विजेतेपद आणि न्यूयॉर्कमध्ये कारोल वेमुलर ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठल्याने ती तिच्या सर्वोत्तम अशा १३ व्या रँकिंगमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली.
तिने गेल्या पाच वर्षांत प्रथमच पल्लिकलला मागे टाकले. पल्लिकलने आॅगस्टमध्ये विवाहामुळे कमी स्पर्धेत सहभाग घेतला आणि आता ती १६ व्या स्थानावर आहे. जोशना तिला गवसलेल्या लयीचा पूर्ण फायदा घेऊ इच्छिते आणि तिचे लक्ष्य पुढील सत्रात चांगली कामगिरी करणे हे आहे. दीपिकासाठी कोर्टबाहेर वर्ष संस्मरणीय ठरले आणि ती क्रिकेटर दिनेश कार्तिकसोबत विवाहबद्ध झाली. ती म्हणाली, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे म्हटल्यास हे वर्ष माझ्यासाठी चांगले गेले नाही आणि मी जशी खेळू शकते तशी खेळू शकली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे माझ्या रँकिंगमध्ये जास्त घसरण झाली नाही. पुढील वर्षी चांगली कामगिरी करून पुन्हा टॉप दहामध्ये पोहोचण्यात शस्वी ठरेल अशी आशा आहे.’’
भारताचा अव्वल टॉप खेळाडू सौरव घोषालने कोलकाता येथे गेल्या तीन वर्षांतील त्याचे पहिले विजेतेपद जिंकले. हे त्याचे एकूण सहावे पीएसए विजेतेपद होते. वर्षअखेरीस १८ व्या रँकिंगवर असणारा घोषाल वर्षाच्या प्रारंभी २४ व्या स्थानी होता. तो वर्षातील चार स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला. त्यात कोलंबिया येथील स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धेत तो उपविजेता ठरला.(वृत्तसंस्था)
हे वर्ष माझ्यासाठी उत्कृष्ट ठरले; परंतु मी इथपर्यंतच थांबू इच्छित नाही. मी पुढे जाऊ शकते याचा मला विश्वास आहे. निश्चितच माझे लक्ष्य हे अव्वल दहा आणि नंतर टॉप पाचमध्ये समाविष्ट होणे हे आहे. मी सध्या २९ वर्षांची आहे आणि स्क्वॉशचा इतिहास साक्षीदार आहे की अनेक खेळाडू वयाच्या तिशीनंतरही यशोशिखरावर पोहोचले आहेत.
- जोशना चिनप्पा
माझ्यासाठी हे चांगले वर्ष ठरले. मी चार वेळेस अंतिम फेरीत पोहोचलो आणि त्यात एक विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. मला यापेक्षा चांगली कामगिरी करायला हवी होती. पुढील सत्रात माझे लक्ष्य हे रँकिंग उंचावणे आणि अव्वल दहा खेळाडूंविरुद्ध जास्तीत जास्त विजय मिळवणे हे आहे.
- सौरव घोषाल