नरसिंगबाबत 'नाडा'ने दिलेली क्लीन चिट 'वाडा'ने फेटाळली, नरसिंगच्या अडथळ्यात वाढ
By admin | Published: August 16, 2016 09:38 PM2016-08-16T21:38:01+5:302016-08-16T21:38:01+5:30
(नाडा) शिस्तपालन समितीच्या निर्णयास जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) क्रीडा लवादाकडे आव्हान दिलं आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - नरसिंग यादवला निर्दोष ठरवण्याच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीच्या निर्णयास जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) क्रीडा लवादाकडे आव्हान दिलं आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमधील नरसिंगच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लवादापुढील सुनावणी 18 रोजी होण्याची शक्यता आहे. नरसिंगची ऑलिंपिकमधील लढत 19 ऑगस्टला आहे.
वाडाने क्रीडा लवादाकडे 13 ऑगस्टलाच दाद मागितली होती. नरसिंगची 25 जून रोजी चाचणी झाली होती. त्यात तो दोषी आढळला होता. त्यानंतर वाडाच्या आदेशानुसारच नाडाने पाच जुलैला पुन्हा चाचणी घेतली होती. त्यातही नरसिंग दोषी आढळला होता. दोन चाचण्यांत दोषी ठरल्यामुळे नरसिंगवर चार वर्षांची बंदी कायम राहण्याची शक्यता आहे. नाडाच्या शिस्तपालन समितीने नरसिंगला निर्दोष ठरवले होते. मात्र नाडानं दिलेली क्लीन चिट वाडानं फेटाळून लावली आहे. वाडाच्या अपिलावर 18 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. नरसिंगची लढत होण्यापूर्वी काही तास अगोदरच ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीत भारताच्याच बाजूने निकाल लागेल, असा विश्वास भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्याचवेळी राकेश गुप्ता यांनी कॅससमोरील सुनावणी सुरू झाली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता वाडा अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करीत आहेत, असे सांगितले.