नदाल, मुगुरुजा उपउपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Published: June 3, 2017 12:54 AM2017-06-03T00:54:38+5:302017-06-03T00:54:38+5:30
नऊवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने एकतर्फी लढतीत केवळ एक गेम गमावताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत
पॅरिस : नऊवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने एकतर्फी लढतीत केवळ एक गेम गमावताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले तर गरबाईन मुगुरुजाने जेतेपद राखण्याच्या मोहिमेत आगेकूच केली. ोला गॅरोवर पुन्हा एकदा जेतेपदाचा दावेदार मानल्या जात असलेल्या नदालने जॉर्जियाच्या निकोलोज बासिलशविलीचा ६-०, ६-१, ६-० ने पराभव केला. नदालला पुढच्या फेरीत मायदेशातील सहकारी १७ व्या मानांकित रॉबर्टो बतिस्ता आगुतच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. आगुतने चेक प्रजासत्ताकच्या जिरी बेस्लीचा ६-३, ६-४, ६-३ ने पराभव केला.
पाचव्या मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिक व आॅस्ट्रियाचा सहावा मानांकित डॉमिनिक थिएम अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले.
दुसऱ्या सेटमध्ये गुइलेमो गार्सिया लोपेजने जांघेच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे राओनिकचा पुढच्या फेरीचा मार्ग प्रशस्त झाला. राओनिक ६-१, १-० ने आघाडीवर असताना स्पेनच्या लोपेजने लढतीतून माघार घेतली. राओनिकला पुढच्या फेरीत २० व्या मानांकित स्पेनच्या पाब्लो कारेनो बुस्ताच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. बुस्ताने ११ व्या मानांकित बुल्गारियाच्या ग्रीगोर दिमित्रोव्हचा ७-५, ६-३, ६-४ ने पराभव केला. थिएमने २५ व्या मानांकित अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनवर ६-१, ७-६, ६-३ ने सरशी साधली.
महिला विभागात चौथ्या मानांकित मुगुरुजाने २७ व्या मानांकित कझाखस्तानच्या युलिया पुतिनस्तसेव्हाचा ७-५, ६-२ ने पराभव केला. १३ व्या मानांकित फ्रान्सच्या ख्रिस्टिना म्लादेनोव्हिचने अमेरिकेच्या शेल्बी रोजर्सची झुंज ७-५, ४-६, ८-६ ने मोडून काढली तर २३ व्या मानांकित आॅस्ट्रेलियाच्या सामंथा स्टोसुरने अमेरिकेच्या बेथानी माटेक सँड््सचा ६-२, ६-२ ने सहज पराभव केला. (वृत्तसंस्था)
गतचॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचला शुक्रवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्ट्जमॅनविरुद्ध विजय मिळवताना निर्णायक सेटपर्यंत घाम गाळावा लागला. तिसऱ्या मानांकित जोकोव्हिचला सामन्यादरम्यान वर्तनासाठी ताकीदही देण्यात आली. सर्बियाच्या या खेळाडूने या लढतीत ५-७, ६-३, ३-६, ६-१, ६-१ ने सरशी साधली. जोकोव्हिचने सामन्यात ५५ टाळण्याजोग्या चुका केल्या. श्वाटर्््जमॅनला अखेर पाठदुखीचा फटका बसला. त्याने अखेरच्या १४ पैकी १२ गेम गमावले. जोकोव्हिचला उपउपांत्यपूर्व फेरीत १६ वे मानांकन प्राप्त फ्रान्सचा लुकास पाऊली व १९ वे मानांकन प्राप्त स्पेनचा अल्बर्ट रोमोस विनोलास यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
पूरव-शरण जोडी
उपउपांत्यपूर्व फेरीत
भारताच्या पूरव राजा - दिविज शरण या पुरुष जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या दुहेरी गटात विजयी कूच करताना आॅस्ट्रियाच्या आॅलिव्हर मराच आणि क्रोएशियाच्या मॅट पाविच या जोडीला नमवले. यासह पूरव - दिविज यांनी स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, भारताचा दिग्गज लिएंडर पेसला मात्र दुहेरी गटातून गाशा गुंडाळावा लागला. स्पर्धेत बिगरमानांकीत असलेल्या भारताच्या पूरव - दिविज यांनी तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना आॅलिव्हर - मॅट यांचा ६-४, ३-६, ६-४ असा पाडाव केला. पहिला सेट सहजपणे जिंकून दमदार आघाडी घेतलेल्या भारतीयांना दुसऱ्या सेटमध्ये आॅलिव्हर - मॅट यांनी बाजी मारत सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये नेला.
या निर्णायक सेटमध्ये मात्र भारतीयांनी जबरदस्त वर्चस्व राखताना आॅलिव्हर - मॅट यांना पुनरागमनाची संधी न देता बाजी मारली. भारतीय जोडीने ५ एस मारले. तसेच, ५ पैकी २ ब्रेक पॉइंट जिंकताना बाजी मारली. दुसरीकडे, भारताचा स्टार खेळाडू लिएंडर पेसला मात्र स्पर्धेबाहेरचा रस्ता पकडावा लागला. अमेरिकेचा स्कॉट लिप्सी याच्यासह खेळताना टॉमी रोबरेडो - डेव्हिड मारेरो या स्पेनच्या जोडीविरुध्द पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)
टॉमी - डेव्हिड यांनी मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना पेस - स्कॉट यांना ७-६, ६-२ असा धक्का दिला.