नदाल ठरला ‘बाजीगर’, तर सेरेना युगाचा अस्त?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 03:36 AM2019-09-12T03:36:44+5:302019-09-12T03:37:15+5:30
विश्व क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ३३ वर्षांचा नदाल गुडघेदुखीने त्रस्त राहिला, पण त्याने हार मानली नाही.
किशोर बागडे
नागपूर : ‘लाल मातीचा’ बादशाह स्पेनचा राफेल नदाल याने दोन वर्षांनंतर यूएस ओपन टेनिसवर वर्चस्व गाजविले. दुसरीकडे अमेरिकन स्टार सेरेना विलियम्सचा येथेही पराभवाने पिच्छा पुरविला. बाळाच्या जन्मानंतर सेरेनाला अंतिम फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश येत असल्याचे घरच्या कोर्टवर निष्पन्न झाले. त्यामुळे सेरेना युगाचा अस्त होत आहे, असे मानायचे का? फायनल व खराब खेळ असे सेरेनाबाबत समीकरण झाले आहे.
राफेल नदाल आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यातील अंतिम लढतीचा थरार तब्बल पाच तास चालला. नदालने २७ व्यांदा ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यापैकी १८ ग्रँडस्लॅम त्याने जिंकले होते. हे त्याचे १९वे ग्रँडस्लॅम ठरले. पण हार्डकोर्टवरील हे यश त्याला एका रात्रीतून मिळालेले नाही. यामागे त्याची झुंजारवृत्ती, सातत्य, समर्पितवृत्ती आणि मेहनत आहे. या जेतेपदामुळे या स्पर्धेतील मोठा विक्रम नदालच्या दृष्टिपथात आला. पाच जेतेपदाचे मानकरी रॉजर फेडरर, पीट सँप्रास आणि जिम्मी कोनोर्स यांच्या पंक्तीत बसायला आता नदालला एक जेतेपद हवे आहे.
विश्व क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ३३ वर्षांचा नदाल गुडघेदुखीने त्रस्त राहिला, पण त्याने हार मानली नाही. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची त्याची जिद्द कायम आहे. हा विक्रम होईपर्यंत सुखाची झोप घ्यायची नाही, असा नदालचा निर्धार कायम आहे. वयाच्या आठव्यावर्षी १२ क्षेत्रीय जेतेपद मिळविणारा नदाल वयाच्या १५ व्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू बनला. २००५ मध्ये त्याने जेव्हा दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावला त्यावेळी पहिल्याच प्रयत्नात वयाच्या १९ व्या वर्षी पहिल्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. आंद्रे आगासीनंतर करियर ग्रँडस्लॅम व आॅलिम्पिक एकेरी सुवर्ण विजेता नदाल एकमेव टेसिनपटू ठरला.
दुसरीकडे, फायनलमध्ये आपण का पराभूत होतो, हे सेरेना विलियम्ससाठी कोडे ठरले आहे. यूएस ओपनमधील पराभव ‘अक्षम्य’ असल्याचे या दिग्गज खेळाडूने कबुल केले. २३ ग्रँडस्लॅम विजेती म्हणून कुठवर मिरवणार, विक्रमाला गवसणी घालणार की नाही, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. कॅनडाची १९ वर्षीय बियांका आंद्रेस्कूने सेरेनाला धूळ चारली. २० वर्षांआधी सेरेनाने पहिले ग्रँडस्लॅम जिंकले, तेव्हा आंद्रेस्कूचा जन्मही झाला नव्हता. या स्तरावर इतका खराब खेळ स्वत: सेरेनाला पसंत नाही. विश्व क्रमवारीत २०० खेळाडूंच्या यादीतून बाहेर झालेल्या बियांकाने सेरेनाविरुद्ध फायनल खेळण्याचे केवळ स्वप्न पाहिले होते. ती खेळली अन् जिंकली देखील. कॅनडाच्या अन्य खेळाडूंसाठी आता ती प्रेरणा बनली असून मेहनतीच्या बळावर कुणीही चॅम्पियन बनू शकतो, असा आदर्शही तिने घालून दिला आहे.