पोइलीकडून नदाल ‘आउट’
By admin | Published: September 6, 2016 01:43 AM2016-09-06T01:43:28+5:302016-09-06T01:43:28+5:30
फ्रान्सच्या लुकास पोइलीने पुरुषांच्या एकेरीत १४ ग्रॅण्डस्लॅम विजेत्या राफेल नदालला पराभवाचा धक्का देत युएस ओपन टेनिस स्पर्धेत खळबळ उडवून दिली.
न्यूयॉर्क : फ्रान्सच्या लुकास पोइलीने पुरुषांच्या एकेरीत १४ ग्रॅण्डस्लॅम विजेत्या राफेल नदालला पराभवाचा धक्का देत युएस ओपन टेनिस स्पर्धेत खळबळ उडवून दिली. विद्यमान चॅम्पियन नोव्हाक जोकोवीचने रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीत सहज विजयाची नोंद करताना पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोवीचला अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान मिळवताना विशेष कष्ट पडले नाहीत. त्याने जागतिक क्रमवारीत ८४व्या स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या केली एडमंडचा ६-२, ६-१, ६-४ने पराभव केला. एडमंड प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता; पण सर्बियन खेळाडूपुढे त्याची डाळ शिजली नाही. जोकोवीचला उपांत्यपूर्व फेरीत नव्वया मानांकित फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्सोंगाने अमेरिकेच्या जॅक सोकचा ६-३, ६-३, ६-७, ६-२ ने पराभव केला.
पोइली व त्सोंगा यांच्याव्यतिरिक्त गेल मोनफिल्स उपांत्यपूर्व फेरी गाठणारा फ्रान्सचा तिसरा खेळाडू ठरला. मोनफिल्सने सायप्रसच्या मार्कोस बागदातिसचा ६-३, ६-२, ६-३ ने पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत पोइली आणि मोनफिल्स समोरासमोर असतील.
महिला विभागात जर्मनीच्या एंजलिक केरबरने उपांत्यपूर्व फेरी गाठताना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी सेरेनाला या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणे गरजेचे आहे. केरबरने पेट्रा क्वितोव्हाचा ६-३, ७-५ ने पराभव करून सेरेनावरील दडपण वाढविले आहे. सेरेनाला स्टेफी ग्राफचा १८६ आठवडे अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे. केरबर अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली आणि सेरेनाने जेतेपद पटकावले, तर तिला अव्वल स्थान कायम राखता येईल.
दुसऱ्या मानांकित केरबरला उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित इटलीच्या रॉबर्टा विन्सीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विन्सीने युक्रेनच्या लेसिका सुरेंकोचा ७-५, ६-२ ने पराभव
केला.(वृत्तसंस्था)
।२२ वर्षीय फ्रान्सचा खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेला लुकास पोइली विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता.
६-१, २-६, ६-४, ३-६,
७-६ ने रविवारी त्याने स्पेनचा सुपरस्टार नदालचा पराभव केला. मनगटाच्या दुखापतीमुळे नदालने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीतून माघार घेतली होती, तर याच कारणामुळे त्याला विम्बल्डन स्पर्धेत सहभागी होता आले नाही. सेवात्सोव्हा गेल्या २२ वर्षांत ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारी लातवियाची पहिली खेळाडू ठरली आहे. त्याआधी, लारिसा सेवेचेंकोने १९९४मध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. सेवात्सोव्हाने येथे उपांत्यपूर्व फेरी गाठताना दुसऱ्या फेरीत फ्रेंच ओपन चॅम्पियन गार्बाइन मुगुरुजाचा पराभव केला होता. बोपन्ना-गॅब्रिएल पराभूत
भारताचा स्टार खेळाडू रोहन बोपन्ना आणि त्याची कॅनडाची जोडीदार गॅब्रिएल दाब्रोवस्की यांना मिश्र दुहेरीत कोलंबियाचा रॉबर्ट फराह व जर्मनीची एना लेना ग्रोएनफेल्डकडून पराभव पत्कारावा लागला. बोपन्ना-गॅब्रिएल जोडीला रॉबर्ट ऐना लेनाकडून ६-१, २-६, ८-१० असा ५८ मिनिटांत पराभव पत्कारावा लागला.