नदाल १४ व्यांदा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 05:33 AM2022-01-24T05:33:51+5:302022-01-24T05:34:20+5:30
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ; अलेक्झांद्र झ्वेरेवचा धक्कादायक पराभव
मेलबर्न : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने याने विक्रमी १४ व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या एड्रियन मनारिनो याचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत दिमाखात आगेकूच केली. पुढील फेरीत नदाल कॅनडाच्या डेनिस शापोवालोवविरुद्ध खेळेल. दुसरीकडे, जर्मनीच्या अलेक्झांद्र झ्वेरेवचे आव्हान चौथ्या फेरीतच संपुष्टात आले.
नदालने शानदार विजयासह आगेकूच करताना मनारिनोचा ७-६(१६-१४), ६-२, ६-२ असा पराभव केला. पहिला गेम टायब्रेकमध्ये रोमांचकरीत्या रंगला. यावेळी पहिला गेम टायब्रेकमध्ये जिंकण्यासाठी नदालला तब्बल २८ मिनिटे ४० सेकंदापर्यंत झुंजावे लागले. मात्र यानंतर नदालने सलग दोन सेटमध्ये आक्रमक खेळ करत आपला दर्जा दाखवून दिला. यासह विश्वविक्रमी २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावण्यापासून नदाल केवळ तीन विजय दूर राहिला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्यपूर्व फेरी १४ व्यांदा गाठत नदालने अशी कामगिरी करणाऱ्या जॉन न्यूकॉम्बच्या कामगिरीशी बरोबरी केली. दिग्गज रॉजर फेडररने या स्पर्धेत सर्वाधिक १५वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच नदालने ४५व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून या विक्रमात तो रॉजर फेडरर (५८) आणि नोवाक जोकोविच (५१) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
सानिया-राम उपांत्यपूर्व फेरीत
भारताच्या सानिया मिर्झाने अमेरिकन साथीदार राजीव रामसोबत खेळताना मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दोघांनी सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत एलेन पेरेज-मात्वे मिडलकूप यांचा ७-६(८-६), ६-४ असा पराभव केला. स्पर्धेत सानियाच्या रुपाने एकमेव भारतीय आव्हान आहे.
n महिला एकेरीत फ्रेंच ओपन विजेत्या बारबरा क्रेजिकोवाने दोन वेळच्या ऑस्ट्रेलियन विजेत्या विक्टोरिया अजारेंकाचा ६-२, ६-२ असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. पुढील फेरीत क्रेजिकोवाला २०१७ सालच्या अमेरिकन विजेत्या मेडिसन कीजविरुद्ध खेळावे लागेल. कीजने आठव्या मानांकित पॉला बाडोसाला ६-३, ६-१ असे नमवले.
n नदाल उपांत्यपूर्व फेरीत
शापोवालोवच्या कडव्या आव्हानास सामोरा जाईल. शापोवालोवने स्पर्धेतील धक्कादायक निकाल नोंदवत तिसरे मानांकन प्राप्त झ्वेरेवला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. यासह शापोवालोवने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
n १४ व्या मानांकित शापोवालोवने ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या झ्वेरेवचा ६-३, ७-६(७-५), ६-३ असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.