जोकोविचविरुद्ध नदालने घेतला वचपा; हायव्होल्टेज सामन्यात मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 08:20 AM2022-06-02T08:20:38+5:302022-06-02T08:21:11+5:30
नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोकोविचला ६-२, ४-६, ६-२, ७-६ असे पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पॅरिस : ‘लाल मातीचा बादशाह’ म्हणून ओळखला जाणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपनमधील आपली मक्तेदारी सिद्ध करीत उपांत्यपूर्व सामन्यात अव्वल मानांकित नोवाक जोकोविचला नमावले. गेल्या वर्षी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोकोविचने नदालला नमवले होते. त्या पराभवाची व्याजासहीत परतफेड करताना नदालने विश्वविक्रमी २२व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे कूच केली आहे.
नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोकोविचला ६-२, ४-६, ६-२, ७-६ असे पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात त्याची लढत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होईल. यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये नदाल-जोकोविच सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली होती. जोकोविचने ८८ मिनिटांच्या दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु, ३५ वर्षीय नदालला उपस्थित चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. त्यामुळे चौथ्या सेटमध्ये ब्रेकडाऊन होऊनही नदालने चार सेटमध्येच सामन्याचा शेवट केला. मागच्या वर्षी जोकोविचने त्याला येथे उपांत्य फेरीत पराभूत केले होते.