नदाल भारताविरुद्ध खेळणार
By admin | Published: September 7, 2016 03:38 AM2016-09-07T03:38:43+5:302016-09-07T03:38:43+5:30
भारताला आगामी डेव्हिस चषक विश्व प्ले आॅफ टेनिस सामन्यात १४ ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी असलेला राफेल नदाल याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.
नवी दिल्ली : भारताला आगामी डेव्हिस चषक विश्व प्ले आॅफ टेनिस सामन्यात १४ ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी असलेला राफेल नदाल याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. या लढतीसाठी स्पेनने नदालचा समावेश असलेला बलाढ्य संघ जाहीर केला.
अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत पराभूत झालेला जागतिक क्रमवारीतील पाचव्या स्थानावरील खेळाडू नदालशिवाय १३ व्या स्थानावरील डेव्हिड फेरर, १८ व्या स्थानावरील फेलिसियानो लोपेझ आणि १९ व्या स्थानावर असलेला दुहेरीतील खेळाडू मार्क लोपेझ यांनाच स्पेन संघात समावेश आहे.
भारतीय संघात साकेत मायनेनी(एटीपी रँकिंग १४३), रामकुमार रामनाथन (२०२), रोहन बोपन्ना (१७) आणि लिएंडर पेस (६२) यांचा समावेश आहे.
स्पेन संघाबाबात प्रतिक्रिया देताना न्यूयॉर्कहून बोलताना साकेत म्हणाला, ‘ हा स्पेनचा सर्वांत बलाढ्य संघ आहे. आमच्यासाठी अवघड आव्हान असेल. सामन्यात आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करू, अशी आशा आहे. स्पेन संघ टेनिस प्रकारात युरोपमध्ये सर्वांत भक्कम मानला जातो. भारतीय संघ विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. आशिया- ओसियाना क्षेत्रातून प्ले आॅफ गाठण्यासाठी भविष्यातही भारताला एकेरीत उत्कृष्ट खेळाडूंचा शोध घ्यावा लागेल.
भारत आशिया- ओसियाना गटात कोरियावर ४-१ ने विजयासह प्ले आॅफमध्ये दाखल झाला. स्पेनने युरोप- आफ्रिका गटात रोमानियाला नमवून प्ले आॅफमध्ये धडक दिली. (वृत्तसंस्था)