नदाल विजयी, जोको पराभूत
By admin | Published: June 8, 2017 04:21 AM2017-06-08T04:21:57+5:302017-06-08T04:21:57+5:30
फ्रेंच ओपनचा गतविजेता नोवाक जोकोविच याला आॅस्ट्रेलियाचा सातवा मानांकित खेळाडू डॉमनिक थीम याने पराभवाचा धक्का दिला
पॅरीस : फ्रेंच ओपनचा गतविजेता नोवाक जोकोविच याला आॅस्ट्रेलियाचा सातवा मानांकित खेळाडू डॉमनिक थीम याने पराभवाचा धक्का दिला. थीम याने जोकोविचला ७-६(७-५), ६-३, ६-० असे पराभूत करत खळबळ माजवून दिली. थीमचा उपांत्य फेरीतील सामना आता ९ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदाल याच्यासोबत होणार आहे.
जोकोविच आमि थीम यांच्यातील लढतीत पहिला सेट अटीतटीचा झाला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये थीम याने जोकोवर वर्चस्व गाजवले. तिसऱ्या सेटमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि गतविजेत्या जोकोविचला एकही गुण मिळवता आला नाही. हा सेट त्याने ६-० अशा मोठ्या फरकाने गमावला. या विजयासोबतच थीम याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नदाल सोबत होईल.
दुसरीकडे नदाल याने दहाव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. पोटदुखीमुळे स्पेनच्याच पाब्लो कारेनो बस्टा याने सामन्यातून माघार घेतली आणि नदालचा उपांत्य फेरीतील प्रवेश सोपा झाला. कारेनो बस्टा याने माघार घेतली तेव्हा नदाल ६-२,२-० असा आघाडीवर होता.
विक्रमी नऊ वेळचा फ्रेंच ओपन विजेता नदालला उपांत्य फेरीत जोकोविचशी सामना करावा लागू शकतो. जोको याला उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रियाच्या सहाव्या मानांकित डोमिनिक थीम विरोधात खेळायचे आहे. नदाल याने पहिल्या सेटमध्ये चार वेळा कारेनो बस्टो याची सर्व्हिस तोडली. पहिल्यादांच ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेल्या बस्टोला ५१ मिनिटांनंतर पोटदुखीमुळे बाहेर पडावे लागले. पहिल्या सेटनंतर त्याने वैद्यकीय पथकाची मदत घेतली होती.
क्ले कोर्टवर नदालचा शंभरावा विजय
चौथ्या मानांकित नदाल याने क्ले कोर्टवर खेळल्या गेलेल्या पाच सेट असलेल्या १०२ पैकी १०० सामन्यात विजय मिळवला आहे. खुल्या काळात दहा वेळा एकाच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचणारा तो पाचवा पुरुष खेळाडू आहे. फ्रेंच ओपनमध्ये त्याने ७७ सामने जिंकले, तर दोन वेळा त्याला पराभवाचा सामना करावा लागला. नदाल याने २०१४ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये आपले अखेरचे ग्रॅण्डस्लॅम पटकावले होते.