नदालचा संघर्षपूर्ण विजय
By admin | Published: January 22, 2017 04:24 AM2017-01-22T04:24:06+5:302017-01-22T04:24:06+5:30
स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल याला आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत शनिवारी जर्मनीचा युवा खेळाडू अॅलेक्झांडर ज्वेरेवविरुद्ध विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा
मेलबर्न : स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल याला आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत शनिवारी जर्मनीचा युवा खेळाडू अॅलेक्झांडर ज्वेरेवविरुद्ध विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. महिला गटात अमेरिकेची टेनिस तारका सेरेना विल्यम्सने अंतिम १६ मधील आपला प्रवेश निश्चित केला.
नदालने ‘टेनिस खेळातील भविष्य’ म्हणून गणला जाणारा १९ वर्षीय ज्वेरेव याच्यावर ४ तासांपर्यंत रंगलेल्या चुरसपूर्ण लढतीत ४-६, ६-३, ६-७, ६-३, ६-३ असा विजय मिळविला. या विजयामुळे ३० वर्षीय नदालदेखील अनुभवी रॉजर फेडररसह अंतिम १६ मध्ये पोहोचला आहे. नदाल चौथ्या फेरीत फ्रान्सच्या गेल मोंफिल्सशी दोन हात करील.
२०१६च्या अखेरीस झालेल्या दुखापतीमुळे विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सेरेनाला आता चांगलाच सूर गवसला असून, तिचे स्टेफी ग्राफच्या ओपन युगाच्या रेकॉर्डकडे लक्ष आहे. सेरेनाची लढत बार्बरा स्ट्राइकोव्हा हिच्याशी होईल. बार्बरा हिने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया हिचा ६-२, ७-५ असा पराभव केला. सामन्यानंतर सेरेनाने स्ट्राइकोव्हाविरुद्ध लढण्यास सज्ज असल्याचा इशारा दिला. (वृत्तसंस्था)
सानिया, बोपन्ना मिश्र दुहेरीत दुसऱ्या फेरीत
सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी मिश्र दुहेरीत आपापल्या जोडीदारासह दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. बोपन्ना आणि कॅनडाच्या गॅब्रियला डाबरोवस्की यांनी सुपर टायब्रेकरमध्ये माईकल व्हिनस आणि कॅटरिना स्रेबोत्निक या जोडीला ६-४, ६-७, १०-७ असे पराभूत केले. त्याचप्रमाणे सानिया आणि क्रोएशियाच्या इव्हान डोडीज या द्वितीय मानांकित जोडीने अमेरिकन ओपन चॅम्पियन लॉरा सिएजेमंड आणि मॅट पाविच यांचा ७-५, ६-४ असा पराभव केला.
पुरुष दुहेरीत बोपन्ना आणि लिएंडर पेस हे पराभूत झाल्याने भारताचे यातील आव्हान संपुष्टात आले आहे. सानिया महिला दुहेरीत झेक प्रजासत्ताकाच्या बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने शर्यतीत आहे. मुलांच्या एकेरीत भारताचा सिद्धांत भाटिया पहिल्या फेरीत आॅस्ट्रेलियाच्या अॅलेक्झांडर क्रनोक्रॉककडून ६-२, ६-७, ७-५ असा पराभूत झाला. मुलींमध्ये जील देसाईने आॅस्ट्रेलियाच्या कॅटलीन स्टेनेसचा ६-४, ३-६, ७-५ असा पराभव केला.
दुसरीकडे, गत चॅम्पियन नोव्हाक जोकोवीचला नमवून स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद करणारा ११७वे रँकिंगप्राप्त डेनिस इस्तोमिन याने पाब्लो कारेना बुस्ता याच्यावर ६-४, ४-६, ६-४, ४-६, ६-२ असा विजय मिळवताना प्रथमच अंतिम १६ जणांत स्थान मिळविले.
डेव्हिड गोफिनने क्रोएशियाच्या इवो कार्लोविचची ६-३, ६-२, ६-४ अशी घोडदौड खंडित केली आणि आता तो आॅस्ट्रियाच्या आठव्या मानांकित डोमेनिक थिएमशी लढेल.
रॉबर्टो बातिस्ता एगुटने स्पेनचा सहकारी डेव्हिड फेररचा ७-५, ६-७, ७-६, ६-४ असा पराभव केला आणि आता तो तिसऱ्या मानांकित राओनिचशी दोन हात करील. राओनिच याने जाइल्स सिमोन याच्यावर ६-२, ७-६, ३-६, ६-३ असा विजय मिळविला.
महिलांच्या गटात ब्रिटनच्या जोहाना कोंटा हिने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन कॅरोलिन वोझ्नियाकीवर ६-३, ६-१ अशी मात केली.
कोंटा अंतिम १६ मध्ये रशियाच्या ३०व्या मानांकित कॅटरिना मारकोव्हाशी दोन हात करील. मारोकोव्हा हिने सहाव्या मानांकित डोमिनिका सिबुलकोव्हाचे तीन सेटमध्ये रंगलेल्या लढतीत ६-२, ६-७ (७-३), ६-३ असे आव्हान मोडीत काढले.