नागपूर खेळपट्टीचा क्रो यांचा निर्णय ‘वैयक्तिक’: मनोहर
By admin | Published: December 23, 2015 11:49 PM2015-12-23T23:49:19+5:302015-12-23T23:49:19+5:30
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममधील खेळपट्टीबाबत आयसीसी मॅच रेफ्री जेफ क्रो यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे मत बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले
नवी दिल्ली : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममधील खेळपट्टीबाबत आयसीसी मॅच रेफ्री जेफ क्रो यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे मत बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले. आयसीसीचा निर्णय आमच्यासाठी शिरोधार्ह असल्याचेही मनोहर यांनी मान्य केले. मनोहर हे आयसीसी चेअरमन आहेत; पण त्यांनी आयसीसीचा निर्णय अप्रत्यक्षरीत्या अमान्य केला, हे विशेष.
जामठ्याच्या खेळपट्टीवर भारतीय संघाने द.आफ्रिकेला कसोटी सामन्यात १२४ धावांनी पराभूत केले होते. हा सामना अडीच दिवसांत आटोपला. रविचंद्रन अश्विन याने त्या सामन्यात १२ गडी बाद केले होते. आयसीसी मॅच रेफ्रीने नागपूरच्या खेळपट्टीविरुद्ध आपला अहवाल आयसीसीकडे पाठविला होता. त्यावर आयसीसीने ‘खराब’ रेटिंग दिले, शिवाय व्हीसीएला ‘तंबी’ दिली होती.
बीसीसीआयच्या अधिकृत फेसबुक पेजवर चाहत्यांशी लाइव्ह संवाद साधताना मनोहर म्हणाले,‘आयसीसीने खराब खेळपट्टीबाबत नियम तयार केले आहेत. त्यात चार गट असतात. उत्कृष्ट, चांगली, खराब आणि धोकादायक हे ते चार गट आहेत.’ खराब विकेटबाबत ते पुढे म्हणाले, ‘चेंडू एकदम स्पिन होत असेल किंवा एकदम स्विंग होत असेल, तर विकेट खराब मानली जाते. नागपुरात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चेंडू खूप स्पिन झाला; शिवाय चेंडू उसळीही घेत होता. माझ्या मते, हा क्रो यांचा वैयक्तिक निर्णय होता. हा निर्णय व्यक्तिसापेक्ष वेगवेगळा असू शकतो. विकेटवर चेंडू उसळी घेत होता किंवा अपेक्षेपेक्षा अधिक वळण घेत होता, हे ज्याच्या- त्याच्या मते परिस्थितीनुरूप कमी-अधिक होऊ शकते. एखाद्या फिरकीपटूला इतरांच्या तुलनेत अधिक टर्न मिळत असावा. या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्या; पण आयसीसीने निर्णय दिला आहे आणि आम्ही निर्णयास बांधील आहोत.’ मातीची प्रत आणि हवामान यामुळे भारतात वेगवान आणि चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या तयार करणे शक्य नाही; पण भारताच्या युवा संघाला सज्ज करण्यासाठी आम्ही १९ वर्षांचा संघ; तसेच भारतीय अ संघ या दोन्ही संघांचे अधिक दौरे आयोजित करणार आहोत. टायगर पतौडी हे माझे सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार आणि गॅरी सोबर्स हे महान क्रिकेटपटू असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)
>> सामने वाटून घेतले नाहीत!
आगामी टी-२० विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यात नागपूर आणि धर्मशाला या दोन केंद्रांना झुकते माप दिल्याचा आरोप मनोहर यांनी या वेळी फेटाळून लावला. मनोहर म्हणाले, ‘विश्वचषकाचे यजमानपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बीसीसीआयने आयसीसीकडे आठ केंद्रांचा प्रस्ताव दिला होता.
आयसीसी पाचच स्थळांवर सामने आयोजित करण्यास इच्छुक होते. सचिव अनुराग ठाकूर यांनी बार्बाडोसमधील आयसीसीच्या वार्षिक बैठकीत भारत किमान आठ स्थळांवर विश्वचषकाचे आयोजन करेल, असे ठासून सांगितले होते.
कागदावर धर्मशाला आणि नागपूर या स्थळांना अधिक सामने मिळाल्याचे दिसते; पण या स्थळांवर पात्रता सामने अधिक होणार आहेत. भारताचे सामने नागपूर, धर्मशाला, बंगळुरू आणि मोहाली येथे होतील. सेमिफायनल दिल्ली आणि मुंबईत, तर फायनल कोलकाता येथे होईल. मनात असते तर नागपूर आणि धर्मशाळा येथे सेमिफायनलचे आयोजन करू शकलो असतो. नागपूरचे जामठा स्टेडियम ४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेले देशातील सर्वोत्कृष्ट स्टेडियम आहे.’
>> डीआरएस
मान्य नाही
मनोहर यांनी बीसीसीआयचा डीआरएसला विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार केला. पायचितच्या निर्णयावर आमचा मुख्य आक्षेप असल्याचे ते म्हणाले. आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील दिवस-रात्र कसोटीच्या प्रयोगाबद्दल विचारताच मनोहर म्हणाले, ‘कसोटी क्रिकेट चाहत्यांना स्टेडियमकडे आकर्षित करते काय, हे तपासावे लागेल.’