नाडाने ‘ओके’ केल्यास नरसिंग रिओला जाऊ शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 03:19 AM2016-07-29T03:19:22+5:302016-07-29T03:19:22+5:30
डोपिंगप्रकरणी मल्ल नरसिंग यादव याला राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) हिरवा झेंडा दिल्यास तो रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रवीण राणा याचे स्थान घेऊ शकतो. यात आम्हाला
नवी दिल्ली : डोपिंगप्रकरणी मल्ल नरसिंग यादव याला राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) हिरवा झेंडा दिल्यास तो रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रवीण राणा याचे स्थान घेऊ शकतो. यात आम्हाला काही अडचण नसल्याचे भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) गुरुवारी स्पष्ट केले.
नरसिंग हा नाडाच्या चाचणीत प्रतिबंधित स्टेरॉईड सेवनात दोषी आढळल्याने भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) ४७ किलो फ्री स्टाईलसाठी प्रवीण राणा याची पर्यायी खेळाडू म्हणून निवड केली. आयओएचे महासचिव राजीव मेहता म्हणाले, ‘आयओएची भूमिका पोस्टमनसारखी आहे. आम्ही सुविधा उपलब्ध करून देतो. आम्ही डब्ल्यूएफआयच्या इच्छेनुसार नरसिंगऐवजी प्रवीण राणा याचे नाव पुढे केले. या नावाला युनायटेड विश्व कुस्तीने होकार दिला. डब्ल्यूएफआय नरसिंगला पुन्हा पाठविण्यास इच्छुक असेल तर आमची हरकत नाही. अट इतकीच की नरसिंगला नाडा पॅनलला दोषमुक्त करायला हवे, शिवाय आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने निर्णय स्वीकारायला हवा.’
क्रीडा मंत्रालयाकडून अंतिम परवानगी घेण्याची गरज आहे काय, असे विचारताच मेहता म्हणाले, ‘माझ्या मते याची काही गरज नाही. सरकारकडून आम्ही कुठल्याही प्रकारचे आर्थिक अनुदान घेत नाही.’ (वृत्तसंस्था)