नरसिंग प्रकरण : साई, नाडाच्या अधिकाऱ्यांचा कटात सहभाग!
By Admin | Published: August 23, 2016 09:29 PM2016-08-23T21:29:11+5:302016-08-23T21:29:11+5:30
मल्ल नरसिंग यादव याला भक्कम पाठिंबा देणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय)मंगळवारी नवा आरोप केला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ : मल्ल नरसिंग यादव याला भक्कम पाठिंबा देणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय)मंगळवारी नवा आरोप केला. नरसिंगच्या डोपिंग कटकारस्थानात भारतीय क्रीडा प्राधिकरण(साई)तसेच राष्ट्रीय डोपिंगविरोधी
संस्थेचे(नाडा)काही अधिकारी गुंतले असल्याचे डब्ल्यूएफआय म्हटले आहे.
क्रीडा लवादाने नरसिंगवर चार वर्षांची बंदी घातली. त्यामुळे रिओ आॅलिम्पिकच्या ७५ किलो फ्री स्टाईल प्रकारात तो खेळू शकला नाही. नाडाने नरसिंगला क्लीन चिट दिल्यानंतर वाडाने(विश्व डोपिंविरोधी संस्था) आक्षेप घेत निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर लवादाने नरसिंगच्या विरोधात निर्णय दिला.
डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बृजभूषणसिंग म्हणाले,आम्हाला रिओमध्ये लवादापुढे सुनावणीच्यावेळी काही नव्या गोष्टी कळल्या. नरसिंगची चाचणी इतक्या कमी वेळेत का करण्यात आली, अशी विचारणा वाडाने करताच नाडाने सांगितले की, साईच्या सोनिपत केंद्रातील ज्युनियर अधिकारी रमेश यांनी आमच्याकडे केंद्रातील काही खेळाडू प्रतिबंधित औषध घेत असल्याची लेखी तक्रार केली होती. याच तक्रारीच्या आधारे पुन्हा डोप परीक्षण झाले.
ज्या लोकांनी २५ जून रोजी झालेल्या पहिल्या चाचणीआधी नरसिंगच्या जेवणात उत्तेजक मिसळले त्यांनीच पुन्हा एकदा हे काळे कृत्य केल्यानंतर रमेश यांनी नाडाकडे तक्रार पत्र पाठविले होते. नरसिंगच्या लघवीचा नमुना २७ जूनला घेण्यात
आला, त्यात प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. नाडाचे ज्युनियर अधिकारी यात सामील असावेत, असा माझा अंदाज आहे.
बृजभूषण पुढे म्हणाले,ह्य डब्ल्यूएफआयला आधी या तक्रारीची माहिती देण्यात आली नव्हती. रिओमध्ये आमच्याकडे हे पत्र असते तर आमची बाजू भक्कम ठरली असती. नाडाने देखील अशा पत्राची माहिती दिली नसल्याने माझा संशय वाढला.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे. नरसिंग दोषी असेल तर त्यालाही कठोर शिक्षा व्हावी, अशी आपली भूमिका आहे. हा मोठा कट असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेले बृजभूषण म्हणाले, मी सुनावणीच्यावेळी उपस्थित होतो. कॅसच्या तज्ज्ञाने नरसिंगने टॅबलेट घेतल्याचा दावा केला पण त्यादृष्टीने पुरावे दिले नाहीत. सोनिपत पोलिसांनी गुन्हे नोंदविण्यात आणि आरोपींना शोधण्यात हयगय केल्यामुळे नरसिंगवर चार वर्षांची बंदी लागली. पोलिसांनी काहीच केले नाही. आजपर्यंत गुन्हेगार बाहेर आहेत, यासाठी पोलीस जबाबदार असल्याचा बृजभूषण यांनी
पुनरुच्चार केला.