नरसिंगला अडकविण्यात आले
By admin | Published: July 25, 2016 01:51 AM2016-07-25T01:51:25+5:302016-07-25T01:51:25+5:30
आॅलिम्पिक स्पर्धेपूर्वी नरसिंग यादव डोपचाचणीत अपयशी ठरल्यामुळे निराश झालेले त्याचे प्रशिक्षक जगमाल सिंग यांनी या मल्लाला अडकवण्यात आल्याचे सांगत
नवी दिल्ली : आॅलिम्पिक स्पर्धेपूर्वी नरसिंग यादव डोपचाचणीत अपयशी ठरल्यामुळे निराश झालेले त्याचे प्रशिक्षक जगमाल सिंग यांनी या मल्लाला अडकवण्यात आल्याचे सांगत राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीला (नाडा) त्याची पुन्हा चाचणी घेण्याचे आवाहन केले.
भावूक झालेले जगमाल म्हणाले, ‘नरसिंग डोपचाचणीत अपयशी ठरल्याचे वृत्त आमच्यासाठी धक्कादायक आहे. तो १० वर्षांचा होता तेव्हापासून त्याला बघत आहे. तो असे करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळी गाठण्यासाठी तो नेहमी आपल्या सवयीबाबत (भोजन, औषध) जागरूक असतो. यापूर्वीही त्याची अनेकदा डोपिंग चाचणी झाली, पण तो कधी अपयशी ठरला नाही. त्यामुळे त्याला यात अडकविण्यात आले आहे, असा मला विश्वास आहे.’ जगमाल यांनी नाडाकडे नव्याने डोपचाचणी घेण्याचे अपील केले.
जगमाल म्हणाले, ‘पुन्हा चाचणी व्हायला हवी. त्यात जर तो पुन्हा अपयशी ठरला, तर आमचा कुठला आक्षेप नाही. कुठली स्पर्धा नसताना केवळ सराव करीत असताना तो डोपिंग का करणार, असा प्रश्न उपस्थित होतो.’ २५ जून ते ५ जुलै या कालावधीत नाडाने दोनदा चाचणी घेतली. या दोन्ही दिवशी नरसिंगने आपले मूत्र नमुने देण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही, असेही जगमाल म्हणाले.
प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘जर त्याने कुठला बंदी असलेला पदार्थ घेतला असता, तर नाडाचे अधिकारी आले त्या दिवशी तो सुटी घेऊन कामासाठी बाहेर गेला असता, पण त्याने कुठल्याही चाचणीपासून बचाव करणचा प्रयत्न कधीच केलेला नाही.’
नरसिंगने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावताना ७४ किलो वजन गटात आॅलिम्पिक कोटा मिळवला होता. दिग्गज मल्ल सुशील कुमारऐवजी नरसिंगला आॅलिम्पिकसाठी पसंती दर्शविण्यात आली. सुशीलने निवड चाचणीची मागणी केली होती, पण भारतीय कुस्ती महासंघ आणि दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळली. दरम्यान, सुशील कुमारचे मेंटर सतपाल सिंग यांनी संकेत दिले की, गरज भासली तर दोनदा आॅलिम्पिक पदकाचा मानकरी ठरलेला सुशील कुमार नरसिंगचे स्थान घेण्यास सज्ज आहे. (वृत्तसंस्था)
मी याबाबत सांगू शकत नाही. हे मोठे षड्यंत्र आहे. तो नेहमी प्रामाणिक राहिला आहे. अनेकजण त्याच्या विरोधात आहेत. हे कुणी केले आणि कुणाच्या निर्देशाने घडले, याचा आम्ही शोध घेत आहोत. मी कुणाचे नाव घेऊ शकत नाही. असे जर केले तर मला ते सिद्ध करावे लागेल. तो कसून मेहनत घेत आहे. रिंगच्या बाहेर अनेकदा खाण्यापिण्याचे साहित्य ठेवून तो अनेकदा सरावाला जात असल्याचे माहीत आहे. त्याचे प्रोटीन सप्लिमेंट त्याच्या रूममध्ये ठेवलेले असायचे. कुणी त्यात भेसळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवणे शक्य नसते.’
- जगमाल सिंग, नरसिंगचे प्रशिक्षक
नरसिंगबाबतचे वृत्त ऐकल्यानंतर निराश झालो. डोपिंगच्या मुद्याकडे तो कसा काय दुर्लक्ष करू शकतो, त्यामुळे निश्चितच देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. सुशील नरसिंगच्या स्थानी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतो, हे मी म्हणत नाही. हा निर्णय डब्ल्यूएफआय आणि क्रीडा मंत्रालयाला घ्यायचा आहे. सुशील रिओमध्ये प्रतिनिधित्व करण्याबाबत विचार करू शकतो.
- सत्पाल, सुशीलचे मेंटर