ऑलिम्पिकपूर्वी नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी

By admin | Published: July 24, 2016 10:24 AM2016-07-24T10:24:05+5:302016-07-24T13:12:10+5:30

भारताचा कुस्तीपटू नरसिंग पंचम यादवचा रिओ ऑलिम्पिकमधील सहभाग अनिश्चिततेच्या भोव-यात सापडला आहे.

Narsing Yadav guilty of provoking intake test before Olympics | ऑलिम्पिकपूर्वी नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी

ऑलिम्पिकपूर्वी नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ - भारताचा कुस्तीपटू नरसिंग पंचम यादवचा रिओ ऑलिम्पिकमधील सहभाग अनिश्चिततेच्या भोव-यात सापडला आहे. ७४ किलो फ्रीस्टाईल गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करणारा नरसिंग उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला आहे. नाडाच्या महासंचालकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) तपासात नरसिंगचे दोन नमुने पॉझिटीव्ह आढळल्याची सूत्रांची माहिती आहे. शुक्रवारी नरसिंगने नाडाच्या समितीसमोर हजर होऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती आहे. आपल्या विरोधात कारस्थान रचले असून, रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागापूर्वी आपल्या मार्गात अडथळे आणले जात आहेत असे नरसिंगने समितीसमोर सांगितल्याची माहिती नाडामधील सूत्रांनी दिली. 
 
नाडाने पाच जुलैला सोनीपत येथील साईच्या केंद्रात नरसिंगची उत्तजेक चाचणी केली होती. त्याच्या ए चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला बी टेस्टसाठी बोलवण्यात आले. त्याचाही अहवाल  पॉझिटिव्ह आला. नाडाने आपला अंतिम अहवाल भारतीय कुस्ती महासंघाला पाठवून दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने ही बाब क्रीडा मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. 
 
कुस्ती महासंघाला कारस्थानाचा संशय असल्याने क्रीडा मंत्रालयाने नाडाला तात्काळ या प्रकरणी सुनावणी घेण्याचे निर्देश दिले अशी सूत्रांची माहिती आहे. या अहवालानंतर खबरदारी म्हणून भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंग यादवाला जॉर्जियाला जाण्यापासून रोखले आहे. 
 
२५ जुलैला नरसिंग अन्य कुस्तीपटूंसोबत रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी जॉर्जियाला जाणार होता. तेथूनच सर्व कुस्तीपटू थेट रिओला रवाना होणार आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अद्यापपर्यंत कोणीही अधिकृतपणे बोलायला तयार नाहीय. नरसिंग यादवचा फोनही स्विचऑफ येत आहे. 
 
मागच्यावर्षी दोहा येथे झालेल्या सिनिअर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या नरसिंग पंचम यादव याने पुरुषांच्या ७४ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले. या कामगिरीमुळे नरसिंगला रिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले होते. यानंतर त्याला दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणा-या सुशीलकुमार बरोबर कायदेशीर लढाई लढावी लागली. सुशीललाही ७४ किलो वजनी गटातून ऑलिम्पिकला जायचे होते. 
 
 

Web Title: Narsing Yadav guilty of provoking intake test before Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.