कॅसच्या निर्णयानंतर बेशुद्ध झाला होता नरसिंग
By Admin | Published: August 21, 2016 05:10 AM2016-08-21T05:10:12+5:302016-08-21T05:10:12+5:30
उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत अपयशी ठरल्यामुळे आॅलिम्पिक क्रीडाग्रामातून बाहेर केले गेल्यामुळे हताश झालेला भारतीय पहिलवान नरसिंग यादव याला जेव्हा कॅसने चार वर्षांची
- शिवाजी गोरे
(थेट रिओ येथून)
रिओ : उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत अपयशी ठरल्यामुळे आॅलिम्पिक क्रीडाग्रामातून बाहेर केले गेल्यामुळे हताश झालेला भारतीय पहिलवान नरसिंग यादव याला जेव्हा कॅसने चार वर्षांची बंदी लादली असल्याचे समजले तेव्हा तो बेशुद्ध झाला होता.
भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह म्हणाले, ‘नरसिंग काल बेशुद्ध झाला होता. आज स्थिती ठीक आहे. पूर्ण चौकशीअंती परिस्थिती स्पष्ट होईल.’ नरसिंगवर आता डोपचा कलंक लागला आहे आणि तो आपली ही लढाई पंतप्रधान कार्यालयापर्यंत घेऊन जाणार असल्याची त्याने शपथ घेतली आहे.
तो म्हणाला, ‘माझी बदनामी झाली आहे. पूर्ण देशावर कलंक लागला आहे. आता मला फाशी झाली तरी मी याचा तपास करायला लावेन. त्यासाठी दिवस-रात्र एक करीन.’ सोनिपतमध्ये सरावादरम्यान सेवन पदार्थ अथवा खाण्याच्या पदार्थांमध्ये हे बंदी असेलेले औषध मिसळण्यात आल्याचा दावा नरसिंगने केला. राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सी (नाडा)नेदेखील याविषयी सहमती दर्शवली आणि त्याला त्या आरोपातून मुक्त करताना आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास मान्यता दिली होती.
गडबड केले जाण्याचे साक्षीदार मजबूत असते, तर तो सहजपणे आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाला असता, अशा विधानाची पुनरावृत्तीही नरसिंगने केली. तो म्हणाला, ‘यात एक मोठ्या लॉबीचा समावेश आणि त्यांच्या नावाचा उलगडा व्हायला हवा. ही बाब देशाच्या खेळाच्या भवितव्याशी निगडित आहे. माझी कोणतीही चूक नव्हती; परंतु मी त्याचा बळी ठरलो. आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मी केलेली गेल्या चार वर्षांची कठोर मेहनत वाया गेली. अशा प्रकारच्या राजकारणामुळेच आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाची शक्यता संपते. जर मला न्याय मिळाला नाही, तर पुन्हा खेळाचे नुकसान होईल. त्यामुळे भारताची युवा पिढी खेळाकडे वळणार नाही.’
नरसिंगला आज सकाळी आॅलिम्पिक क्रीडाग्रामातून बाहेर करण्यात आले आहे. बंदीमुळे त्याचे मान्यतापत्र आणि प्रवेशही रद्द करण्यात आला आहे. तो ज्या हॉटेलमध्ये थांबला तेथून तो दिल्लीसाठी रवाना होणार आहे.
नरसिंगने कोणाचे नाव उघड न घेता म्हटले, ‘या पूर्ण प्रकरणाशी निगडित घटनेमुळे कोणाचा यात सहभाग आहे, हे स्पष्ट होत आहे.’ त्याआधी भारताला अॅथेन्स २00४ मध्ये डोपिंगमुळे बदनामीला सामोरे जावे लागले होते. तेव्हा महिला भारोत्तोलक सनामाचा चानू आणि प्रतिमा कुमारी हे डोपिंगमध्ये दोषी आढळले होते. त्यानंतर त्यांना क्रीडाग्राममधून बाहेर करण्यात आले होते.
सीबीआय चौकशी लवकर व्हावी : नरसिंग यादव
‘‘भारतीय कुस्तीचे नुकसान झाले आहे. मला अडकविण्यासाठी माझ्याविरोधात ज्यांनी कोणी हे कटकारस्थान रचले असेल त्यांची लवकरात लवकर सीबीआय चौकशी करून ज्यांनी कोणी हे सर्व केले आहे त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. जर मी दोषी असेल तर मला शिक्षा करा,’’ असे व्यक्तव्य कुस्तीपटू नरसिंग यादव याने केले. क्रीडा लवादाने त्याच्यावर चार वर्षाची बंदी घातल्यानंतर त्याने सकाळी ११ वाजताच गेम्स व्हिलेज सोडले होते. तेव्हापासून तो कोठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते आणि त्यातच बॅडमिंटनमध्ये सिंधूने रौप्यपदक जिंकल्यामुळे थोडा वेळ का होईना सर्वांना नरसिंगचा विसर पडला होता. रात्री एका मोठ्या पंचतारांकित सोसायटीत उशिरा प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्याने वरील व्यक्तव्य केले. लोकमतशी बोलताना नरसिंग म्हणाला, ‘कोट्यवधी भारतीयांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही याचा मला खेद आहे. या षड्यंत्राच्या मागे कोण आहे याचा हरियाणा पोलिसांनी तपास करावा. असे प्रकार पुढे वारंवार होत राहिले तर कुस्तीकडे कुणी वळणार नाही आणि भारतातील कुस्ती संपून जाईल. माझ्या बरोबर सराव करणाऱ्या मल्लाची मी नावासह माहिती दिली असताना सुध्दा पोलीस त्याला अजून कसे शोधून काढू शकत नाही म्हणजे यात काही तरी काळेबेरे नक्कीच आहे. त्याचा शोध पोलिसांना का लागत नाही? त्याच्या मागे कोण आहे आणि त्याने हे कोणाच्या सांगण्यावरून केले आहे याचा सोक्षमोक्ष व्हायलाच पाहिजे. त्या मुलाने तुझ्या जेवणात उत्तेजक द्रव्य टाकले आहे हे तुला कसे कळाले ? त्या मुलाने जेव्हा माझ्या जेवणात ते टाकले तेव्हा माझ्या इतर मित्रांनी आणि माझे जेवण जो करतो त्याने सुध्दा त्याला पाहिले होते. नाडासमोर सुध्दा त्याची साक्ष झाली होती. पण तो आता पोलिसांना सापडत नाही, असे पोलीस सांगत आहेत. येथे आल्यावर घरच्यांबरोबर काही बोलणे झाले का? असे विचारले असता तो म्हणाला, एकदा बोलणे झाले, ते खूप काळजीत आहेत. क्रीडा लवादाचा निर्णय माझ्याविरोधात गेल्यामुळे ते खूप दु:खी आहेत. मी सुध्दा त्यांच्याबरोबर व्यवस्थित बोलू शकलो नाही. त्यांना माझ्यावर विश्वास होता की मी नक्की पदक जिंकेल.