नासीरची अष्टपैलू खेळी, बांगलादेश-अ विजयी
By admin | Published: September 19, 2015 03:44 AM2015-09-19T03:44:25+5:302015-09-19T03:44:25+5:30
नासीर हुसेन याने प्रथम प्रतिकूल परिस्थितीत केलेले नाबाद शतक आणि त्यानंतर त्याने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर बांगलादेश अ संघाने दुसऱ्या अनधिकृत
बंगळुरू : नासीर हुसेन याने प्रथम प्रतिकूल परिस्थितीत केलेले नाबाद शतक आणि त्यानंतर त्याने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर बांगलादेश अ संघाने दुसऱ्या अनधिकृत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आज येथे भारत अ संघाचा ६५ धावांनी पराभव करताना ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
एन. चिन्नास्वामी स्टेडियममधील आजचा पूर्ण दिवसच २३ वर्षीय अष्टपैलू मोहंमद नासीर हुसेन याच्या नावावर राहिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशाची ५ बाद ८२ अशी स्थिती असताना त्याने खेळपट्टीवर पाय ठेताना ९६ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह नाबाद १०२ धावा केल्या आणि आपल्या संघाला ८ बाद २५२ पर्यंत मजल मारून दिली.
हुसेनने लिट्टन दास (४५) याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ७० आणि नंतर अराफात सनी (१७) याच्याबरोबर सातव्या गड्यासाठी केलेल्या ५० धावांच्या भागीदाऱ्यांमुळे बांगलादेशाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची एकवेळ २ बाद १३७ अशी चांगली स्थिती होती; परंतु भारताने २ बाद १३७ अशा चांगल्या स्थितीतून २० धावांतच ६ फलंदाज गमावल्यामुळे त्यांची स्थिती ८ बाद १५७ अशी बिकट झाली. त्याला कारणीभूत ठरणाऱ्या नासीर हुसेनने जादुई फिरकी गोलंदाजी करताना ३६ धावांत ५ गडी बाद केले. त्याच्या कामगिरीमुळे बांगलादेशाने भारत अ संघाचा डाव ४२.२ षटकांत १८७ धावांत गुंडाळला.
नासीर हुसेनला वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनची चांगली साथ मिळाली. रुबेलने ३३ धावांत ४ गडी बाद केले. भारताकडून कर्णधार उन्मुक्त चंदने सर्वाधिक ५६ धावा केल्या. पहिल्या सामन्यातील भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरणारा गुरकीरतसिंग मान ३४ धावा काढून अखेरच्या फलंदाजाच्या रूपात बाद झाला. या दोन संघांतील अखेरचा तिसरा एकदिवसीय सामना २० सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.
संक्षिप्त धावफलक :
बांगलादेश अ : ५० षटकांत ८ बाद २५२. (नासीर हुसेन नाबाद १०२, लिट्टन दास ४५, अनामुल हक ३४, सौम्या सरकार २४. रिषी धवन ३/४४, करण शर्मा २/४०, रुश कलेरिया १/३५, सुरेश रैना १/२१)
भारत अ : ४२.२ षटकांत सर्व बाद १८७. (उन्मुक्त चंद ५६, मयंक अग्रवाल २४, मनीष पांडे ३६, सुरेश रैना १७, गुरकीरतसिंग ३४, नासीर हुसेन ५/३६, रुबेल हुसेन ४/३३).