राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेचा मान गोव्याला; २२ राज्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 11:13 AM2018-09-02T11:13:17+5:302018-09-02T11:13:50+5:30
एरोबिक्स या खेळाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गोव्यात आयोजित करण्याचे ठरले आहे. इंडियन स्पोर्ट्स एरोबिक्स अॅण्ड फिटनेस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर १२ ते १४ आक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होईल.
- सचिन कोरडे
एरोबिक्स या खेळाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गोव्यात आयोजित करण्याचे ठरले आहे. इंडियन स्पोर्ट्स एरोबिक्स अॅण्ड फिटनेस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर १२ ते १४ आक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होईल. या स्पर्धेत देशातील २२ राज्यांचे संघ सहभागी होतील. ४५० खेळाडू आणि ३५ तांत्रिक अधिकाºयांचा समावेश असेल, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
संतोष देशमुख यांनी नुकतीच क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी एरोबिक्स या खेळाची लोकप्रियता आणि विद्यार्थ्यांसाठी असलेली आवश्यकता याची माहिती दिली. सीबीएससी बोर्डच्या राष्ट्रीय चॅम्पियनशीपच्या सक्युर्लरमध्ये गेल्या ७ वर्षांपासून या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ आता अधिक लोकप्रिय होत आहे. त्यामुळे भारतातही मोठ्या प्रमाणात खेळाडू तयार व्हावेत, त्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे देशमुख यांनी सांगितले. बाबू आजगावकर यांनी गोव्यात ही स्पर्धा आयोजित होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच स्पर्धेसाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही दिले.
२०१८-१९ या वर्षातील ही अधिकृत कॅडेट ज्युनियर आणि वरिष्ठ गटातील स्पर्धा असून या स्पर्धेतील विजेत्या संघास १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान मॉस्को (रशिया) येथे होणाºया जागतिक स्पोटर््स एरोबिक्स, फिटनेस अॅण्ड हिप हॉप चॅम्पियनशीपसाठी सहभागाची संधी मिळणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी गोव्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावरील एरोबिक्स कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील १४० खेळाडूंनी भाग घेतला होता. आयोजनावर आंतरराष्ट्रीय एरोबिक्स संघटनेच्या अध्यक्षा रशियाच्या तातियाना पोलकिना यांनी समाधान व्यक्त केले होते. जिन्मॅस्टिकप्रमाणेच लवचिकता हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे. संगीताच्या तालावर विशिष्ट कसरती सादर करून सर्वाधिक गुण मिळवण्याचे आव्हान खेळाडूंपुढे असते.
शारीरिक शिक्षकांसाठी कार्यशाळा
या खेळाचे महत्त्व जाणून क्रीडा संचालक व्ही.एम. प्रभुदेसाई यांनी एरोबिक्सच्या कार्यशाळेच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. गोव्यातील प्रत्येक शाळेपर्यंत हा खेळ पोहचावा तसेच दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, या उद्देशाने राज्यातील शारीरिक शिक्षकांसाठी २७ ते २८ सप्टेंबर दरम्यान पेडे-म्हापसा येथे कार्यशाळा होईल. ही कार्यशाळा क्रीडा संचालनालय आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे. महासंघटनेचे महासचिव संतोष खैरनार हे कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.
गोव्याचे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांच्यासमवेत इंडियन स्पोर्ट्स एरोबिक्स अॅण्ड फिटनेस फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संतोष देशमुख, गोव्याचे दीपक कट्टीमणी आणि महासंघटनेचे महासचिव संतोष खैरनार.