राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 04:36 PM2019-05-13T16:36:15+5:302019-05-13T16:39:22+5:30
जान्हवीने नुकत्याच नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धंतील युथ गटात कांस्यपदक पटकाविले होते
मुंबई : सुप्रसिद्ध राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरेचे काल डोंबिवली येथे तिच्या राहत्या घराजवळ ट्रकखाली येऊन अपघाती निधन झाले. तिच्या पश्चात घरी तिचा लहान भाऊ, आई व वडील असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता डोंबिवली येथे तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
जान्हवीने २०१५ साली जुनिअर राज्य विजेतेपद पटकावून आपल्या खेळाची सुरुवात केली होती. सब - जुनिअर व जुनिअर राष्ट्रीय स्पर्धेत तीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. अवघ्या २० वर्षाच्या जान्हवीने नुकत्याच नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धंतील युथ गटात स्कॉलरशीप मिळविलेल्या बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करताना कांस्यपदक पटकाविले होते.
अलीकडे ती सिनियर गटातही चांगली कामगिरी करत असल्याने भविष्यात महाराष्ट्राला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या.१४ वीत शिकत असलेल्या जान्हवीसाठी तिचे वडील सुनील मोरे यांनी तिला कॅरम खेळण्यासाठी नेहमीच उत्तेजन दिले. नेहमी हसतमुख व मृदु भाषी असलेल्या जान्हवीला अंतिम निरोप देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड व मुंबईतील अनेक कॅरम खेळाडू व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. जान्हवीच्या आकस्मित जाण्याने कॅरम वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.