राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 07:32 PM2019-01-29T19:32:45+5:302019-01-29T19:33:23+5:30
आयओएचे महासचिव राजीव मेहतांचे संकेत : आज क्रीडामंत्री, मुख्यमत्र्यांनाही भेटणार
पणजी : मार्च-एप्रिलमध्ये ठरलेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निवडणुकीच्या कारणांमुळे लांबणीवर न्यावी, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मात्र, भारतीय आॅलिम्पिक संघटनेकडे ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा पर्याय उपलब्ध आहे किंवा नाही, हे अजून स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता आणि स्पर्धेच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष मुकेश कुमार सोमवारी गोव्यात दाखल झाले. त्यांनी पहिल्याच दिवशी मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत स्पर्धेसाठीची सद्यस्थिती आणि भविष्यातील अडचणी यावर चर्चा करण्यात आली. ही स्पर्धा गोव्यातच व्हावी, अशी इच्छा राज्य सरकारची आहे. परंतु, काही कारणांमुळे आम्ही ती पुढे ढकलण्याची विनंती केली, असे मुख्य सचिवांनी मेहता यांना सांगितले. यावर मेहता यांनी स्थिती समजून घेत स्पर्धा गोव्यातच होईल, असे संकेत दिले. त्यामुळे ही स्पर्धा आता सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान होईल, हे सध्यातरी निश्चित झाले आहे.
राजीव मेहता हे गोव्यातील स्पर्धेबाबत अजूनही सकारात्मक असून त्यांना सरकारकडून ठोस आश्वासनाची अपेक्षा आहे. मात्र, स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा एकंदरीत इतिहास पाहता मेहतांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ते उद्या (दि.२९) क्रीडामंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेतील. या बैठकीत स्पर्धेच्या भवितव्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. स्पर्धा मार्च-एप्रिलमध्ये होणार नाही, यावर मात्र शिक्कामोर्तब झाले.
राजीव मेहता यांचे सोमवारी दुपारी २ वाजता आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी स्पर्धेचे सीईओ तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, गोवा आॅलिम्पिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता, खजिनदार परेश कामत, कबड्डी संघटनेचे सचिव नीलेश खांडेपारकर, दत्ता कामत, अनघा वरळीकर व इतर उपस्थित होते. गोव्यात येताच मेहता यांनी मुख्य सचिवांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी राजीव मेहता यांच्यासाठी खास डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राज्यातील विविध संघटनांचे अध्यक्ष तसेच सचिव आणि गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाºयांंचा समावेश होता.
मी आज गोव्याच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा केली. ही बैठक फलदायी झाली. कदाचित, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन-तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात येतील. उद्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक होईल. आयओएचे वरिष्ठ पदधिकारी ही स्पर्धा पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाही. परंतु, मी त्यांना येथील परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन, ही स्पर्धा आम्ही सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये घेउ शकतो.
राजीव मेहता (महासचिव, भारतीय आॅलिम्पिक संघटना)