राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धा : जेतेपदाची ‘हॅट्ट्रीक’ साधण्यास महाराष्ट्र संघ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 07:53 PM2018-07-29T19:53:39+5:302018-07-29T19:54:32+5:30
गेली दोन वर्ष सांघिक जेतेपदावर कब्जा करणारा महाराष्ट्राचा संघ पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे.
मुंबई : गेली दोन वर्ष सांघिक जेतेपदावर कब्जा करणारा महाराष्ट्राचा संघ पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे. मुंबई, औरंगाबाद आणि जळगाव या जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग असलेल्या महाराष्ट्राच्या संघात प्रत्येक ६ मुले - मुली असे एकूण १२ खेळाडूंचा समावेश आहे.
अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या वतीने (आयपा) आणि प्रथमच कर्नाटक राज्य पिकलबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली होत असलेली राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धा ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान बंगळुरु येथील तेरापंथ समाज, भिक्षू धाम जैन प्रार्थना सभागृह येथे पार पडेल. एकूण १७ राज्य संघांचा या स्पर्धेत सहभाग असून महाराष्ट्रासह यजमान कर्नाटक, बिहार, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश, पाँडिचेरी, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या संघामध्ये जेतेपदासाठी चुरस रंगेल. त्याचवेळी गोवा, ओडिसा आणि जम्मू - काश्मिर या राज्य संघांचा समावेश निरिक्षक म्हणून करण्यात आला आहे.
तीन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिल एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा पाच गटांत रोमांचक लढती रंगतील. २०१४ साली मुंबईत झालेल्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारल्यानंतर प्रत्येक स्पर्धेत महाराष्ट्राकडे संभाव्य विजेते मानले जाते. मात्र, महाराष्ट्राला कट्टर प्रतिस्पर्धी राजस्थानकडून तगडे आव्हान मिळेल. राजस्थानने २०१५ साली जबरदस्त प्रदर्शन करताना बलाढ्य महाराष्ट्राला धक्का देत सांघिक जेतेपद हिसकावले होते. यानंतर मात्र, महाराष्ट्राने २०१६ व २०१७ अशी सलग दोन वर्ष सातत्य राखताना जेतेपदावर वर्चस्व गाजवले. आता पुन्हा एकदा हेच सातत्य कायम राखून महाराष्ट्राने सांघिक जेतेपदाची ‘हॅट्ट्रीक’ साधण्याचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्र संघ :
मुले : तेजस महाजन, कुलदीप महाजन, अभिजीत मढभवी, सौमित्र कोरगावकर, अतुल एडवर्ड आणि क्रिष्णा मंत्री (राखीव).
मुली : वृषाली ठाकरे, पूजा वाघ, करिष्मा कालिके, ॠतुजा कालिके, साक्षी बाविस्कर, आणि सलोनी देवडा (राखीव).
प्रशिक्षक : भूपेंद्र पोळ. सहाय्यक प्रशिक्षक : संदीप धायगुडे. राज्य सचिव : चेतन काते. संघ व्यवस्थापक : महेश परदेशी.