अखेर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला मिळणार निधी
By admin | Published: January 9, 2015 01:33 AM2015-01-09T01:33:38+5:302015-01-09T01:33:38+5:30
केरळ येथे येत्या ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
पुणे : केरळ येथे येत्या ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. खुद्द क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी (दि. ८) महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेला तातडीने ८० लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेले काही महिने स्पर्धेच्या निधीवरून रंगलेल्या क्रीडानाट्यावर पडदा पडला आहे.
केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेने १ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव क्रीडा विभागाकडे १ आॅगस्ट २०१४ रोजी दिला होता. मात्र स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली तरी
निधीला मंजुरी मिळाली नव्हती. आॅलिम्पिक संघटनेने दिलेला प्रस्ताव ढोबळ असल्याची भूमिका क्रीडा आयुक्तांनी घेतली होती. तर हा प्रस्ताव ढोबळ असल्याचे समजायला क्रीडा आयुक्तालयाला इतक्या महिन्यांचा कालावधी का
लागला, असे आॅलिम्पिक
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते.
वास्तविक या निधीतून खेळाडूंसाठी क्रीडा साहित्य, शूज, टी-शर्ट, ट्रॅकसूट, तसेच शिबिर आयोजनाचा खर्च करण्यात येतो. मात्र निधीच मिळाला नसल्याने क्रीडा संघटनांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. या वृत्तावर ‘लोकमत’ने गेले दोन दिवस प्रकाश टाकला. रांची येथे झालेल्या ३४व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ४१ सुवर्ण, ४४ रौप्य व ४७ कांस्य अशी कामगिरी केली होती. सेनादल वगळता इतकी पदके मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले होते. असे असतानाही निधी मिळण्यास विलंब होत असल्याने काही क्रीडा संघटनाही आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या.
अखेर क्रीडामंत्र्यांनी या असंतोषाची दखल घेत तत्काळ निधी देण्याचे आदेश दिल्याने क्रीडा वर्तुळातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निधी न मिळाल्याने महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी नेहरूस्टेडियम येथे संघटनेची तातडीची बैठक बोलावली होती. स्पर्धेचा निधी मिळण्यास आणखी विलंब झाल्यास स्वत: निधी उभारण्याचा निर्णय झाला. या निमित्ताने संघटनेचा निधीदेखील वाढेल असे यात ठरविण्यात आले. या बैठकीनंतर पवार यांनी क्रीडामंत्री तावडे यांची बालभारती येथे भेट घेऊन या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर तावडे यांनीदेखील आजच्या आज (गुरुवारी सायंकाळपर्यंत) तातडीने ८० लाख रुपये देण्याचे आदेश दिले.(क्रीडा प्रतिनिधी)
खेळाडूंना निधी मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. प्रस्तावित निधीच्या खर्चापैकी तातडीने ८० लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी करून राज्याला अधिकाधिक पदके
मिळवून द्यावीत.
- विनोद तावडे, क्रीडामंत्री