राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर निवडणूक आचारसंहितेची संक्रांत येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 07:03 PM2019-01-11T19:03:29+5:302019-01-11T19:04:48+5:30

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणखी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

national sports competition in Goa will be postpone due to elections | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर निवडणूक आचारसंहितेची संक्रांत येण्याची शक्यता

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर निवडणूक आचारसंहितेची संक्रांत येण्याची शक्यता

Next

सचिन कोरडे, पणजी : विविध अडथळ्यांच्या गर्तेत अडकलेली आणि वादग्रस्त ठरत असलेली गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणखी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. गोवा सरकारने भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयास तशा आशयाचे पत्र लिहिले आहे. या पत्रात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि सुरक्षा या मुख्य कारणांना पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे असे झाल्यास ही स्पर्धा पुन्हा लांबणीवर पडणार आहे. स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीवरून यापूर्वीच (पान १ वरून) गोव्याच्या क्रीडा क्षेत्रातून साशंकता व्यक्त होत होती. त्यात आता आणखी भर पडली.  
येत्या ३० मार्च ते १४ एप्रिल दरम्यान राज्यात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होईल, असे निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तांत्रिक समिती, आयोजन समिती आणि संघटनांचे संचालक कामालाही लागले होते. साधनसुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.  विविध क्रीडा प्रकारांच्या खेळाडूंच्या निवड चाचणी घेण्यात आल्या. विविध विभागांची एकत्रितपणे बैठक घेऊन अहवालही तयार करण्यात आले होते. गेल्या महिन्यात भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या बैठकीत स्पर्धेचे सादरीकरण झाले होते. त्यात स्पर्धेचे संयुक्त सचिव व्ही. एम. प्रभुदेसाई यांनी मार्चपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही आयओएला दिले होते. आता आयओएकडे राज्य सरकारने पुन्हा समस्यांचा पाढा वाचला आहे. विविध क्रीडा प्रकारांसाठी ग्लोबल निविदा काढण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले होते. त्यामुळे कुठल्याही स्थितीत ही स्पर्धा नियमित वेळेवर होईल, असे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि.९) राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून क्रीडा क्षेत्राला जबर धक्का दिला. 
यासंदर्भात, एका अधिकाºयाने स्पष्ट केले की, आगामी निवडणुकीच्या काळातच ही स्पर्धा आहे. त्यामुळे या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. सुरक्षेचाही मुद्दा आहे. मनुष्यबळही अधिक लागते तसेच याच काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा आहेत. स्पर्धेसाठी स्वयंसेवकही मिळणार नाहीत. या सर्व समस्या एकाच वेळी आल्या आहेत. सरकारपुढेही पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आणखी वेळ देण्यात यावा, अशी विनंती केंद्र सरकार आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेकडे करण्यात आली आहे. 
यजमानांची तारीख पे तारीख....
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी २००८ मध्ये गोव्याचे नाव पहिल्यांदाच पुढे आले होते. त्या वेळी गोव्याने ही स्पर्धा आयोजित करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यानंतर २०११ मध्ये स्पर्धेचे अधिकृत यजमानपद गोव्याला मिळाले. २०११ नंतर पुन्हा २०१५ साठी गोवा चर्चेत आला होता. मात्र त्या वेळी ही स्पर्धा केरळ येथे हलविण्यात आली. २०१७ पासून या स्पर्धेच्या आयोजनावरून गोवा चर्चेत आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेने गोव्याच्या आयोजनाच्या तयारीवरून प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. २ ते १७ फेब्रुवारी २०१९ ही तारीख निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पर्धेसाठी आणखी वेळ द्या. आम्ही तयारी पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर गोव्याला ३० मार्च ते १४ एप्रिल अशी नवी तारीख देण्यात आली होती.
बोधचिन्ह अनावरणाला मुहूर्त मिळेना...
स्पर्धेचे बोधचिन्ह म्हणून निवडण्यात आलेल्या ‘रुबीगुला’चे अनावरणही दोन वेळा लांबणीवर टाकण्यात आले होते. या बोधचिन्हाच्या अनावरणाची २० डिसेंबर ही पहिली तारीख निश्चित झाली होती. त्यानंतर ती जानेवारीत ढकलण्यात आली. जानेवारीचा दुसरा आठवडा संपत येत असूनही बोधचिन्ह अनावरणासाठी सरकारला मुहूर्त मिळाला नाही.

Web Title: national sports competition in Goa will be postpone due to elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा