राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : तांत्रिक समितीकडून आढावा; शंकांचे वारे कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 07:33 PM2018-11-25T19:33:09+5:302018-11-25T19:33:26+5:30
स्पर्धा केंद्रांची पाहणी, राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
पणजी : येत्या ३० मार्च ते १४ एप्रिल २०१९ दरम्यान होणाºया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा या स्पर्धेच्या तांत्रिक समितीने शनिवारी घेतला. या समितीने घटनास्थळी जावून स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. स्पर्धा केंद्रावर सुरू असलेल्या कामावर ही मंडळी १०० टक्के समाधानी नव्हती. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीबाबत अजूनही शंकांचे वारे कायम आहेत.
ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर तांत्रिक समितीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी विविध राज्य संघटनांच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा केली. बैठकीत स्पर्धेसाठी सुरू असलेल्या कामांवरही नजर टाकण्यात आली. दोन तासांच्या या बैठकीत गोवा आॅलिम्पिक संघटनेचे (जीओआय) सचिव गुरुदत्त भक्ता यांनी विविध मुद्दे मांडले. तसेच सरकारकडून सुरू असलेल्या प्रक्रियेचीही माहिती दिली.
यावेळी तांत्रिक समितीचे अध्यक्ष मुकेश कुमार, एस. एम. बाली आणि दुशांत सिंग हे सदस्य उपस्थित होते.
यासंदर्भात, जीओआयचे सचिव गुरुदत्त भक्ता म्हणाले की, आजच्या बैठकीत राज्यातील विविध संघटनेचे अध्यक्ष तसेच सचिवांनी भाग घेतला. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. संघटनांच्या अडचणी आणि त्यांच्या काही मागण्यांवर पुन्हा नजर टाकण्यात आली. तसेच नव्या उभारण्यात येणाऱ्या साधनसुविधा वेळेत कशा पूर्ण होतील, याबाबतही समितीला आश्वस्त करण्यात आले. समितीने सुरू असलेल्या कामावर समाधान व्यक्त केले असून स्पर्धा वेळेवर होतील, असा विश्वास आहे. ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धेच्या वेळी सुद्धा अशीच स्थिती होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांत साधनसुविधा उभारून राज्य सरकारने स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या होत्या. त्यामुळे गोव्याची ती एक परंपराच बनली आहे. यावेळी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवू, असा मला विश्वास आहे.
..तर या चार खेळांवर येईल संकट
तिरंदाजी, तायक्वांदो, जिम्नॅस्टिक आणि कबड्डी या चार संघटनांचे वाद न्यायालयापर्यंत पोहचले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या या वादाचा परिणाम राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर होऊ शकतो. त्यामुळे या सबंधित संघटनांनी यावर लवकर तोडगा काढून स्पर्धेच्या प्रक्रियेसाठी तयारी करावी. नाहीतर चार खेळांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ येईल, असेही स्पर्धा तांत्रिक समितीने आज स्पष्ट केले.
साधनांचे काय?
स्पर्धेत ३० खेळांचा समावेश आहे. बºयाच खेळांची साधने उपलब्ध नाहीत. ती महागडी सुद्धा असतात. ती दोन तीन महिन्या आधीच उपलब्ध करावी लागतात. मात्र, गोवा राज्य सरकारकडून याबाबत अजून निविदा काढण्यात आलेले नाही. या साधनांचे काय? असा सवाल समितीने उपस्थित केला. यावर सरकारकडून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू असून वेळ पडली तर सर्व साधने विमानातून मागविली जाईल, असे सांगण्यात आले.
काही शंका आणि प्रश्न आमच्या मनात आहेत ज्या आम्ही मुख्य सचिवांपर्यंत पोहचवल्या आहेत. आम्ही १०० टक्के समाधानी नाही. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे प्रकल्प. हे प्रकल्प फेब्रुवारीपर्यंत पूर्ण व्हायला हवेत. आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यावर त्यांनी आम्हाला आश्वस्त केले. मुख्य सचिव जातीने लक्ष घालत असून आम्हालाही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. स्पर्धा वेळेवर होतील, असा विश्वास वाटतो.
-मुकेश कुमार, अध्यक्ष, तांत्रिक समिती.