National sports day: क्रीडा संस्कृती फुलण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 12:37 AM2018-08-29T00:37:55+5:302018-08-29T10:53:50+5:30

अलीकडील काही वर्षांमध्ये भारत क्रीडाक्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती करीत आहे. अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदके पटकावत आहेत. आपल्या खेळाडूंचे हे यश वाखाणण्यासारखे असले, तरी जागतिक स्तरावर तुलनात्मकदृष्ट्या

National Sports Day special: Sports culture to flower ... | National sports day: क्रीडा संस्कृती फुलण्यासाठी...

National sports day: क्रीडा संस्कृती फुलण्यासाठी...

Next

अमोल मचाले

अलीकडील काही वर्षांमध्ये भारत क्रीडाक्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती करीत आहे. अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदके पटकावत आहेत. आपल्या खेळाडूंचे हे यश वाखाणण्यासारखे असले, तरी जागतिक स्तरावर तुलनात्मकदृष्ट्या विचार करता, आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा असल्याचे स्पष्ट होते. क्रीडाक्षेत्रात दबदबा असलेले देश आणि आपल्यात असलेला निर्णायक फरक म्हणजे स्पोर्ट्स कल्चर, अर्थात क्रीडा संस्कृती. २१व्या शतकाच्या पहिल्या दशकापासून आपल्याकडे क्रीडा संस्कृतीने मूळ धरायला प्रारंभ केला असला, तरी त्याची वाढ पाहिजे त्या गतीने झालेली नाही. यामुळेच आॅलिम्पिक वा जागतिक स्पर्धांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचे सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडाप्रकारांतील यश मर्यादित राहिले आहे. भारतात खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कृती फुलली, तरच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिरंगा सातत्याने डौलाने फडकू शकेल. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आपण ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करीत आहोत. आजच्या या दिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही यशस्वी खेळाडूंनी क्रीडा संस्कृती रुजण्यासाठी मांडलेली ही भूमिका...

खेळाडू यशस्वी होण्यासाठी मदत करा,
यशस्वी झाल्यावर नव्हे : दत्तू भोकनळ

आॅलिम्पिकपटू दत्तू भोकनळ याने सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंगमध्ये सांघिक प्रकारात देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. क्रीडा संस्कृती फुलण्यासंदर्भात आपले मत मांडताना तो म्हणाला, ‘‘आपल्याकडे क्रीडा संस्कृती खºया अर्थाने फुलण्यासाठी मुळापासून बदल व्हायला हवेत. गुणवान खेळाडू यशस्वी होण्यासाठी त्याला योग्य ती मदत करायला हवी. मात्र, आपल्याकडे उलटे आहे. खेळाडू यशस्वी झाल्यावर त्याला मदत जाहीर केली जाते. आर्थिक मदत, योग्य मार्गदर्शन याअभावी अनेक खेळाडू क्षमता असूनही पुढे येऊ शकत नाहीत. याचा फटका आपल्याला कमी पदकांच्या रूपात बसतो. हे टाळायचे असेल, तर खेळाडूतील गुणवत्ता बालपणीच हेरून त्याला शासन-प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळायला हवी. यात प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते.’’ वशिलेबाजी ही खेळाला लागलेली कीड आहे. याचा फटका भारतीय क्रीडाक्षेत्राला २ पद्धतींनी बसतो. एक तर यामुळे गुणवान खेळाडू मागे पडतो. दुसरे म्हणजे, क्षमता नसलेल्या खेळाडूला संधी मिळते; मात्र तो पदक जिंकून देऊ शकत नाही. खेळात कामगिरीवर फोकस हवा, पैशावर नव्हे. शालेय स्तरावर मैदानी खेळांना महत्त्व देण्यात यावे. मैदानावर खेळाडूंचा घाम निघालाच पाहिजे. शक्य झाल्यास क्रीडा हा विषय शालेय स्तरापासून अनिवार्य करण्यात यावा, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

शालेय शिक्षणाप्रमाणे खेळ हा विषयही
सक्तीचा करण्यात यावा : अंकिता रैना

काही काळ पुण्यात वास्तव्य केलेली मूळची अहमदाबादची टेनिसपटू अंकिता रैना हिने सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आश्वासक कामगिरी करताना कांस्यपदक प्राप्त केले. सध्या भारताच्या क्रीडाक्षेत्रातील वाटचालीबाबत तिने समाधान व्यक्त केले. अंकिता म्हणाली, ‘‘आपल्या देशात आता क्रीडा संस्कृती बºयापैकी रुजली आहे. ती फुलण्यासाठी, त्याची फळे मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. प्राथमिक स्तरापासून खेळाला प्राधान्य द्यायला हवे. खेळामुळे विद्यार्थिदशेत नुकसान होत नाही; उलट फायदाच होतो हे मी अनुभवातून सांगू शकते. खेळात लवकर निर्णय घ्यावे लागतात; त्यामुळे ‘टाइम मॅनेजमेंट’ची सवय लागते. खेळामुळे आकलनक्षमता वाढते. टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी मला अनेकदा बाहेर जावे लागायचे; त्यामुळे शाळा-कॉलेज नियमितपणे करता आले नाही. मात्र, परीक्षा तोंडावर असताना वेळेवर अभ्यास करूनही मी समाधानकारक गुण मिळवून ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकले. बीएमसीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या मदतीमुळेच मी शिक्षणात येथवर मजल मारू शकले. भविष्यात आपला भारत देश क्रीडाक्षेत्रात यशस्वी व्हावा, यासाठी अनेक प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून शालेय शिक्षणाप्रमाणे खेळ हा विषय सक्तीचा करण्यात यावा. यासाठी केंद्रीय स्तरावर योग्य ती योजना आखण्यात यावी. गुजरातमध्ये दर वर्षी ‘खेलकुंभ’, अर्थात स्पोर्ट्स फेस्टिव्हल आयोजित केला जातो. यात सर्व वयोगटांतील नागरिक सहभागी होतात. समाजात खेळांबाबत अधिकाधिक जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी देशपातळीवर ‘खेलकुंभ’सारखे प्रयत्न व्हायला हवे.’’

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट
ल्ल जन्म : २९ आॅगस्ट १९०५, अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
ल्ल शिक्षण : १९१० ते १९२० (सहावीपर्यंत)
ल्ल नोकरी : १९२२, सेनादलात शिपाईपदावर सुरुवात
ल्ल हॉकीचा श्रीगणेशा : १९२२
ल्ल हॉकीतील पहिले विजेतेपद : १९२३, सेनादल स्पर्धा
ल्ल राष्टÑीय स्पर्धा जिंकून आॅलिम्पिकसाठी निवड : १६ फेब्रुवारी १९२८, कोलकता
ल्ल अ‍ॅमस्टरडॅम आॅलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्ण. - १९२८
ल्ल १९३२ लॉस एंजेलिस आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण
ल्ल १९३४ : वेस्टर्न आशियाई स्पर्धेत सुवर्ण (प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व)
ल्ल १९३५ : भारताचा न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया दौरा
ल्ल २ मे १९३५ : डॉन ब्रॅडमन यांची आॅस्ट्रेलियात भेट
ल्ल १९३६ : आॅलिम्पिक सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक
ल्ल १९५६ : सेनादल संघाकडून श्रीलंका दौरा, सेनादलातून निवृत्त होण्यापूर्वी मेजरपद बहाल
ल्ल ६ आॅक्टोबर १९५६ : राष्टÑपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’
ल्ल ३ डिसेंबर १९७९ : आजाराने निधन
ल्ल डिसेंबर १९९४ : ध्यानचंद यांचा २९ आॅगस्ट हा जन्मदिवस ‘राष्टÑीय क्रीडा दिन’ घोषित
ल्ल २९ आॅगस्ट १९९५ : दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ल्ल ५ डिसेंबर १९८० : पोस्ट खात्याद्वारे मेजर ध्यानचंद यांच्या छायाचित्राचे तिकीट प्रकाशित
ल्ल ८ मार्च २००२ : दिल्लीतील नॅशनल स्टेडियमचे ‘मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम’ असे नामकरण.
ल्ल २९ आॅगस्ट २००५ : जन्मशताब्दीनिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देण्यास केंद्र शासनाकडून प्रारंभ.

आॅलिम्पिकविजेते घडविण्याच्या उद्देशाने
सुविधा उपलब्ध व्हाव्यात : राहुल आवारे
आपल्या देशात क्रीडा संस्कृतीची वाढ संथ आहे. देशातील अनेक भागांत खेळाशी संबंधित प्राथमिक गरजाही पूर्ण होत नाहीत. खेळाडू घडत असताना त्याच्याकडे योग्य लक्ष द्यायला हवे, जे दिले जात नाही. इतर देशांमध्ये १०-१२व्या वर्षी खेळाडूतील क्षमता हेरून त्याला आॅलिम्पिक सेंटर वा स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटरमध्ये पाठविले जाते. आॅलिम्पिकविजेता होईपर्यंत त्या खेळाडूचा सर्व प्रकारचा खर्च तेथील सरकार करते. आपल्याकडे अशी कोणतीही प्रभावी योजना नाही किंवा एखादी असल्यास ती कागदापुरती मर्यादित असते. मागील १०-१२ वर्षांत अनेक क्रीडाप्रकारांमध्ये आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत; मात्र अजूनही त्याचे प्रमाण पाहिजे तसे वाढू शकलेले नाही. आपल्याकडे तालुका, जिल्हा स्तरावर क्रीडासंकुले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी योग्य सुविधा आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध असेल, तरच त्याला अर्थ आहे. अशा क्रीडासंकुलांमध्ये आॅलिम्पिकविजेते घडविण्याच्या उद्देशाने सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता मल्ल राहुल आवारे याने व्यक्त केली.

Web Title: National Sports Day special: Sports culture to flower ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.