National Sports Day : मेजर ध्यानचंद यांच्या खेळावर जर्मनीचा हुकूमशाह हिटलरही होता फिदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:03 PM2020-08-29T14:03:16+5:302020-08-29T14:04:17+5:30
National Sports Day : मेजर ध्यानचंद यांचा जादुई खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नाही हे आमच्या पिढीचे दुर्दैव...
मेजर ध्यानचंद यांचा जादुई खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नाही हे आमच्या पिढीचे दुर्दैव... ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदकं जिंकून दिली.. ज्याच्या क्रुरतेला जग घाबरत होते, तो हिटलरही त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडला... ध्यानचंद यांच्या मनगटात जादू होती, हॉकी स्टीक आणि चेंडू यांच्यातील ताळमेळ त्यांच्यासारखे कोणीच साधू शकत नाही.. म्हणून ते भारताच्या हॉकी इतिहासातील एक महान खेळाडू होते... आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल हेच ऐकून हॉकीच्या प्रेमात पडावेसे वाटले...
हॉकीचे जादुगार म्हणून विख्यात असलेले भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा आज 115 वा जन्मदिन. त्यानिमित्त भारतीय हॉकीला सुवर्णयुगाकडे नेणाऱ्या ध्यानचंद यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा घेतलेला हा आढावा. 29 ऑगस्ट 1905 रोजी जन्मलेले मेजर ध्यानचंद वयाच्या 16व्या वर्षी लष्करात रुजू झाले होते. ध्यानचंद यांनी आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये 400 गोल केले होते. 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकदरम्यान जर्मनीचा हुकूमशाह हिटलर ध्यानचंद यांच्या खेळावर फिदा झाला होता. त्याने ध्यानचंद यांना जर्मनीचे नागरिकत्व स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र देशाभिमानी ध्यानचंद यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता.
ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. क्रिकेटमधील विक्रमवीर सर डॉन ब्रॅडमन आणि मेजर ध्यानचंद यांची 1935 साली अॅडलेड येथे भेट झाली होती. त्यावेळी ध्यानचंद हे क्रिकेटमध्ये मी धावा जमवतो त्या वेगात हॉकीमध्ये गोल करतात असे गौरवोद्गार ब्रॅडमन यांनी काढले होते.