जलतरण स्पर्धेवर स्थलांतराची वेळ, आता फातोर्डाऐवजी कांपाल तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 08:45 AM2018-10-04T08:45:53+5:302018-10-04T08:47:05+5:30
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला असून या स्पर्धेच्या आयोजनाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
- सचिन कोरडे
पणजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला असून या स्पर्धेच्या आयोजनाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. राज्यात साधनसुविधा उभारण्याचे आणि आहे त्या साधनसुविधेत स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. स्पर्धेसाठी फातोर्डा येथील जलतरण तलावाचे नूतनीकरणाचे काम सरकारने हाती घेतले होते. मात्र, हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल, याची शाश्वती दिसत नाही. त्यामुळे येथे होणारी जलतरण स्पर्धा कांपाल येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. स्पर्धा स्थलांतराची चर्चा होतीच त्यावर बुधवारी अधिकृरित्या शिक्कामोर्तब झाले.
३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान होणाºया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या विविध खेळांच्या स्पर्धा संचालकांची पहिली बैठक डॉ. श्मामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झाली. या बैठकीत जलतरण स्पर्धेच्या केंद्राबाबत सविस्तर चर्चा झाली. जलतरण स्पर्धा संचालक वीरेंद्र नानावटी यांनी स्पर्धेसाठी आवश्यक गरजा, सुविधा आणि साधने याविषयी सादरीकरण केले. त्यानंतर त्यांनी काही अडचणी सुद्धा मांडल्या. स्पर्धेसाठी पाच-सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने फातोर्डा येथे जलतरण स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर दुपारी कांपाल जलतरण तलावास समितीने भेट दिली.
यावेळी क्रीडा संचालक व्ही.एम. प्रभुदेसाई उपस्थित होते. कांपाल जलतरण तलावावर डायव्हिंग, मुख्य तलाव, सरावासाठी तलाव व इतर सुविधा आहेत. केवळ पंचांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागेल, यावर चर्चा झाली. दरम्यान, बैठकीच्या पहिल्या दिवशी स्पर्धा संचालकांना क्रीडा सचिव अशोक जे. कुमार यांनी संबोधित केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी क्रीडा संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, स्पर्धेच्या तांत्रिक समितीचे सदस्य मुकेश कुमार, एस. एम. बाली आणि धीरज रॉय चौधरी उपस्थित होते. बॉक्सिंग, हॉकी, बिलियर्ड्स,फेन्सिंग, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बेसबॉल, जलतरण, ट्रायथ्लोन, रग्बी आणि ज्युडोचे स्पर्धा संचालक व इतर उपस्थित होते.
फातोर्डा तलावासाठी काढल्या होत्या पुन्हा निविदा
फातोर्डा जलतरण तलाव बांधण्याासाठी खर्चात कपात करण्यात आली होती. त्यामुळे काम रखडले होते. कंत्राटदारांनीही सुद्धा निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याची हमी दिली नव्हती. त्यामुळे सरकारकडून दोन-तीन वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. बांधकामासाठी २७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या जीएसटीचा फटकाही नूतनीकरणाच्या कामावर दिसून आला होता. येथे एकेरी तलाव असल्यानेही तांत्रिक अडचणी निर्माण झाली. त्यामुळे येथील स्पर्धा कांपालवर स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
स्नूकर, बिलियर्ड्स स्पर्धा पेडेत
स्नूकर आणि बिलियर्ड्स स्पर्धा बांबोळी येथे घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, येथे स्पर्धेसाठी जागा कमी पडत असल्याचे स्नूकरचे संचालक सुनील मोरजकर यांनी सांगितले. किमान १२ टेबल्सची व्यवस्था व्हायला हवी. ती बांबाळी येथे शक्य वाटत नाही. त्यामुळे ही स्पर्धा आता पेडे येथील जुन्या बॅडमिंटन कोर्टवर खेळविली जाणार आहे. यावर मात्र मोरजकर यांनी समाधान व्यक्त केले. बैठक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडली. आम्ही लवकरच समितीकडे आवश्यक दस्तावेज पाठवणार आहोत, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.