राष्ट्रीय महिला कबड्डीपटूचा विनयभंग
By admin | Published: June 24, 2015 11:34 PM2015-06-24T23:34:06+5:302015-06-24T23:34:06+5:30
येथील बर्रा भागात राहणाऱ्या राष्ट्रीय महिला कबड्डीपटूचा विनयभंग व मारपीट झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना वैद्यकीय चाचणीमध्ये खेळाडूला
कानपूर : येथील बर्रा भागात राहणाऱ्या राष्ट्रीय महिला कबड्डीपटूचा विनयभंग व मारपीट झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना वैद्यकीय चाचणीमध्ये खेळाडूला किरकोळ दुखापत झाल्याचे आढळले. परंतु, खासगी वैद्यकीय चाचणीमध्ये नाकाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती असल्याचे कळते. पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने सविस्तर तपास करण्यात येत आहे.
आठ दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेसंबंधी पोलिसांनी आरोपींविरोधात अद्याप कोणतीही कारवाई केली नसून किरकोळ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता . मात्र, आता एसएसपीच्या निर्देशानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात अनेक कलमं वाढवली असून, आरोपींना पकडण्यासाठी एसपी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात दोन गट तयार करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय संघात निवड झालेली ही कबड्डीपटू सध्या पालम क्लब दिल्ली येथे सराव करीत आहे. १५ जूनला ती कानपूर येथे आपल्या घरी गेली होती. तेव्हा तेथील उजाला ठाकूर व गांधी या दोन तरुणांनी तिची छेड काढली. यावेळी कबड्डीपटूने त्यांचा विरोध केला. याचा राग मनात धरून या दोन तरुणांनी मोहल्लयातील इतर तरुणांच्या सोबतीने लाठी-काठी घेऊन तिच्या घरात बळजबरीने शिरुन तरुणीच्या कुटुंबियांना मारहाण केली शिवाय सामनाचीही नासधूस केली. या झटापटीत त्या कबड्डीपटूच्या नाकाचे हाड मोडले. शिवाय तिच्या कुटुंबीयांनादेखील किरकोळ दुखापती झाल्या. आरोपींनी तिला व तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडे गेल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली.
घटनेनंतर धाडस करून ती कबड्डीपटू पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यास गेली तेव्हा पोलिसांनी साधारण कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली व आरोपींना पकडण्याचे प्रयत्नसुद्धा केले नाहीत. दुसरीकडे आरोपींकडून होणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे ती व तिचे कुटुंबीय दहशतीखाली होते. दरम्यान, तिने नंतर एसएसपी शलभ माथुर यांच्याकडे आपबिती कथन केल्यानंतर त्यांनी प्रकरण गांभिर्याने घेत कठोर कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, इतके दिवस शांत राहिल्यानंतर अचानकपणे टीव्ही माध्यमांना याबाबत माहिती दिल्याने पोलिसांना ही घटना संशयास्पद वाटत आहे. एसएसपी माथूर यांनी याबाबत सांगितले की ज्यावेळी ही कबड्डीपटू त्यांना भेटायला आली तेव्हा त्यांनी तिची वैद्यकीय चाचणी केली. ज्यात किरकोळ दुखापती आढळून आल्या. मात्र, तिच्या घरच्यांनी जेव्हा खासगी डॉक्टरकडून तपासणी केली तेव्हा तिच्या नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर असल्याचे आढळले. शिवाय आता पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात ३२३, ५०४, ५०६, ४५२ आणि ३२५ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.