एनबीए खेळाडू भारताच्या प्रेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:57 AM2018-05-31T02:57:24+5:302018-05-31T02:57:24+5:30
एनबीए खेळाडूंना भारतात येण्यास आवडते. आज मी ज्या खेळाडूंसह खेळतोय ते खेळाडू माझ्या देशात,
रोहित नाईक
नवी दिल्ली : एनबीए खेळाडूंना भारतात येण्यास आवडते. आज मी ज्या खेळाडूंसह खेळतोय ते खेळाडू माझ्या देशात, माझ्या गावी येऊन राहतात आणि याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी नाही. एनबीए खेळाडूंना भारत, तसेच भारतीय संस्कृती आवडते,’ असे मत ‘एनबीए’मधील भारताचा पहिला स्टार बास्केटबॉलपटू सतनाम सिंग याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
ग्रेटर नोएडा येथील भारतीय एनबीए अकादमी येथे सुरू असलेल्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स’ (बीडब्ल्यूबी) या दहाव्या आशियाई शिबिरामध्ये १६ देशांतील सुमारे ६६ मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. बुधवारी सतनामसह अनेक एनबीए खेळाडूंनी या शिबिराला भेट देऊन युवा खेळाडूंशी संवाद साधत त्यांना काही टिप्सही दिल्या.
यावेळी २२ वर्षीय सतनामने म्हटले, ‘हायस्कूलपासूनच मला एनबीए खुणावू लागले होते. त्यासाठी कॉलेज आणि इंग्रजी भाषा शिकणे जरुरी असल्याचे कळाले. पण प्रशिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. मला अनेक कॉलेजमधून संधी मिळत होती, परंतु इंग्रजी भाषेच्या कमतरतेने जाऊ शकलो नाही. त्यानंतर मला एनबीएच्या एका निवड चाचणीसाठी संधी मिळाली. तिथे मला आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळायचे होते. माझे कौशल्य पाहून सर्वांना खात्री पटली, की मी एनबीएमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरू शकतो. यानंतर माझा सर्व प्रवास सुरू झाला. थोडक्यात, एनबीए शिबिर अत्यंत महत्त्वाचे असून याचा खेळाडूच्या कारकिर्दीवर सकारात्मक परिणाम होतो.’
‘या शिबिरातून भारतातील युवा खेळाडूंना खूप मोठी संधी मिळत आहे. विदेशी खेळाडूंबरोबर सराव करून त्यांचा खेळ नक्कीच बहरेल. मी मिळालेली संधी साधली आणि त्यासह कठोर मेहनत घेत एनबीएमध्ये प्रवेश केला. शिबिरात मी अनेक खेळाडूंचा खेळ पाहून पुढे आलो. आज एनबीएमध्ये भारताला पसंत करतात, याचा खूप आनंद आहे,’ असेही सतनाम म्हणाला.
भारतीय खेळाडूंच्या वाटचालीविषयी सतनाम म्हणाला, ‘भारतात गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही. पण अनेकदा खेळाडूंना योग्य सुविधा किंवा प्रशिक्षण मिळत नाही. आज चांगली अकादमी सुरू झाली असून चांगले खेळाडू
आणि अमेरिकेतील अव्वल दर्जाचे प्रशिक्षक भारतात आले. याहून मोठी संधी नाही. ते स्वत: येथे शिकवणार असून याचा युवा खेळाडूंना खूप मोठा फायदा होईल. शिकवलेल्या गोष्टींना कठोर मेहनतीची साथ दिली तर कोणताही खेळाडू यशस्वी होईल. मेहनतीला पर्याय नाही.’
या दिग्गजांकडून
मिळाले मार्गदर्शन...
१६ देशांतील ६६ मुला-मुलींचा सहभाग असलेल्या या ‘बीडब्ल्यूबी’ शिबिरामध्ये कोरी ब्रेवेर (ओकलाहोमा सिटी थंडर, यूएस), कॅरिस लेवर्ट (ब्रुकलीन नेट्स, यूएस), केली ओलीनीक (मायामी हीट्स, कॅनडा), ड्वाइट पॉवेल (डलास मेवरिक्स, कॅनडा), दोनवेळची डब्ल्यूएनबीए चॅम्पियन रुथ रिले, माजी डब्ल्यूएनबीए खेळाडू एबॉनी हॉफमन या दिग्गजांकडून मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर सतनाम सिंग व अमरज्योत सिंग हे भारतीय एनबीए खेळाडूही शिबिरार्थींना आपले अनुभव सांगताना मोलाच्या टिप्सही दिल्या.
निराशाजनक कामगिरीनंतर एनबीएतून काही वेळ मायदेशी परतलेल्या सतनामने आपल्या खेळात अनेक सुधारणा केल्या आहेत. याबाबत तो म्हणाला, ‘माझ्या खेळातील त्रुटी आणि त्यानंतर देशात परतल्यानंतर केलेल्या सुधारणा लोकांच्या नजरेत आल्या आहेत, हे माझ्यासाठी खूप चांगले आहे.
आशियाई, राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या मी केवळ २२ वर्षांचा आहे आणि खेळामध्ये सुधारणा करण्यास माझ्याकडे खूप वेळ असून मी त्याचा फायदा घेईन. सध्या आशियाई स्पर्धेतील खेळासाठी जोरदार तयारी सुरू असून या स्पर्धेतून सर्वांनाच जुना सतनाम नक्कीच बघायला मिळेल.’