नेयमार मेस्सीचा चाहता
By Admin | Published: July 12, 2014 12:57 AM2014-07-12T00:57:19+5:302014-07-12T00:57:19+5:30
अर्जेटिना व लियोनेल मेस्सीला जर्मनीविरुद्ध अंतिम फेरीत वर्चस्व गाजविताना व जेतेपदाचा मान मिळविताना बघण्यास उत्सुक असल्याचे मत ब्राझीलचा सुपरस्टार नेयमारने व्यक्त केले आहे.
टेरेसोपोलिस : अर्जेटिना व लियोनेल मेस्सीला जर्मनीविरुद्ध अंतिम फेरीत वर्चस्व गाजविताना व जेतेपदाचा मान मिळविताना बघण्यास उत्सुक असल्याचे मत ब्राझीलचा सुपरस्टार नेयमारने व्यक्त केले आहे.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत नेयमार म्हणाला, ‘बार्सिलोनाचा सहकारी असलेल्या मेस्सीने रविवारी जर्मनीविरुद्धच्या अंतिम लढतीत जेतेपदाला गवसणी घालावी, अशी माझी इच्छा आहे. तो माझा चांगला मित्र असून सहकारी खेळाडू आहे. माङयाकडून त्याला शुभेच्छा.’
नेयमार म्हणाला, ‘विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीदरम्यान दुखापत झाली त्या वेळी मला अर्धागवायूचा झटका येईल, असे वाटत होते, पण दुखापत गंभीर नाही, त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर दुखापत झाल्यामुळे निराश झालो. प्रतिस्पर्धी खेळाडूने मुद्दाम धक्का दिला असे मी म्हणणार नाही, पण फुटबॉलची जाण असलेल्यांना ही धडक साधी नव्हती, याची कल्पना आहे.’
पत्रकार परिषदेत भावुक झालेल्या नेयमारला विश्वकप स्पर्धेत मणक्याच्या हाडाला झालेल्या दुखापतीची आठवण झाली आणि त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध 7-1ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे यजमान ब्राझीलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. (वृत्तसंस्था)