नीरज चोप्रा पुन्हा सुवर्ण कामगिरीसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 06:10 AM2023-09-16T06:10:33+5:302023-09-16T06:11:55+5:30
Neeraj Chopra : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेता, स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा शनिवारी डायमंड लीगच्या अंतिम फेरीत विजेतेपद राखण्यासाठी पुन्हा मैदानात उतरणार आहे.
युजीन - जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेता, स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा शनिवारी डायमंड लीगच्या अंतिम फेरीत विजेतेपद राखण्यासाठी पुन्हा मैदानात उतरणार आहे.
२५ वर्षीय नीरज गतवर्षी झुरिच येथे डायमंड लीगमध्ये विजेता ठरला होता. त्याने या सत्रात आतापर्यंत वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे डायमंड लीगच्या फायनलमध्येही कामगिरीत सातत्य राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. नीरज पुन्हा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला, तर त्याला ३० हजार डाॅलरचे पारितोषिक मिळणार आहे. येथे विजयी ठरल्यास तो डायमंड लीगच्या विजेतेपद राखणारा तिसरा खेळाडू ठरेल. चेक प्रजासत्ताकचा विटेजस्लाव वेस्ली याने २०१२ आणि २०१३मध्ये तर जेकब वाडलेज्चने २०१६-२०१७ मध्ये अशी कामगिरी केली होती.
वाडलेज्च हा सध्या नीरजचा प्रतिस्पर्धी आहे. नीरज यंदा शानदार फार्मात आहे. जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याआधी त्याने डायमंड लीगच्या दोहा आणि लुसाने येथे विजय मिळवला. नीरची सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर आहे. या सत्रात त्याने ८८.७७ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. यंदा तो जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. फायनलमध्ये ९० मीटरपेक्षा दूर भालाफेक करण्याचा नीरजचा प्रयत्न असणार आहे.