नीरज चोप्राकडून विश्वविक्रमाची नोंद
By Admin | Published: July 25, 2016 01:56 AM2016-07-25T01:56:55+5:302016-07-25T01:56:55+5:30
भारताचा ज्युनिअर स्टार अॅथलिट नीरज चोप्राने मुलांच्या भालाफेक प्रकारात ८६.४८ मीटर भाला फेकून आयएएएफ जागतिक २० वर्षांखालील अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत
नवी दिल्ली : भारताचा ज्युनिअर स्टार अॅथलिट नीरज चोप्राने मुलांच्या भालाफेक प्रकारात ८६.४८ मीटर भाला फेकून आयएएएफ जागतिक २० वर्षांखालील अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनिअर गटात विश्वविक्रमाची नोंद करून सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. नीरजने लॅटव्हियाच्या जिगिस्मंड सिरमायसचा ८४.६९ मीटरचा विक्रम मोडीत काढला. जागतिक विक्रमासह त्याने वरिष्ठ गटात राष्ट्रीय विक्रमाचीसुद्धा नोंद केली.
चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये शिकत असलेल्या नीरज ज्युनिअर व सीनिअर गटात विश्वविक्रम नोंदविणारा पहिला भारतीय अॅथलिट ठरला आहे. नीरजने त्याच्या पहिल्या संधीत ७९.६६ मीटर भाला फेकला. त्यानंतर हरियानाच्या या खेळाडूने आपल्या दुसऱ्या संधीत ८६.४८ मीटर भाला उंच हवेत फेकून विश्वविक्रमाची नोंद केली. नीरजने या फेकीत सीनिअर गटात राजिंदर सिंह यांचा ८२.२३ मीटरचा राष्ट्रीय विक्रमसुद्धा मोडीत काढला. त्याने याचबरोबर स्वत:चा पूर्वीचा ८२.२३ मीटरचा उच्चांकसुद्धा मोडला.
रिओ आॅलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय महिला संघात असणाऱ्या सीमा पुनियाने २००० मध्ये २० वर्षांखालील गटात थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते, परंतु उत्तेजक द्रव्यसेवनामध्ये ती अडकल्यामुळे तिचे पदक काढून घेण्यात आले होते. त्यानंतर तिने २००२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. नयजीत कौर ढिल्लोनेसुद्धा २००४ मध्ये कांस्यपदक आपल्या नावावर केले होते. महिला लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये सीनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
या स्पर्धेसाठी मी कसून सराव केला होता. पहिल्या फेरीनंतर माझा आत्मविश्वास वाढला होता. दुसऱ्या संधीत जेव्हा माझ्या हातातून भाला सुटला तेव्हा माझ्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली, की ही फेक विशेष होणार आणि तसेच झाले. जागतिक विक्रमाची नोंद केल्याचे जाहीर आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी यासाठी खूप मेहनत घेतली होती. जास्तकरून माझ्या फिटनेस आणि फेकीच्या तंत्रावर जास्त लक्ष्य केंद्रित केले होते. माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले.
- नीरज चोप्रा
पंतप्रधान नरेंद्र
मोदींकडून विशेष अभिनंदन
नीरज चोप्राने ज्युनिअर गटात विश्वविक्रम नोंदविल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे विशेष अभिनंदन केले.
केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी
नीरजचे अभिनंदन करताना त्याला १० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर
केले.