नीरज चोप्राने रचला इतिहास, लॉसने डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय ठरला, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 08:50 AM2022-08-27T08:50:42+5:302022-08-27T08:51:35+5:30
Neeraj Chopra : 24 वर्षीय नीरज चोप्राने हे विजेतेपद मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भालाफेक केली.
नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) शुक्रवारी पुन्हा एकदा इतिहास रचला. लॉसने डायमंड लीग (Lausanne Diamond League) स्पर्धेत विजेतेपद जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला. तसेच, त्याने झुरिच येथील 7 आणि 8 सप्टेंबर रोजी डायमंड लीगची अंतिम फेरी गाठली आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यासोबतच तो 2023 मध्ये हंगेरी येथील बुडापेस्टमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
24 वर्षीय नीरज चोप्राने हे विजेतेपद मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भालाफेक केली. त्याच्या कारकिर्दीतील हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असलेला नीरज चोप्रा डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या धरतीवर 24 जुलै रोजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरज चोप्राला दुखापत झाली होती. त्यामुळेच तो बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. चोप्राला वैद्यकीय पथकाने चार आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. म्हणूनच भारताचा गोल्डन बॉयला बहुचर्चित स्पर्धेला मुकावे लागले होते.
#NeerajChopra 🇮🇳
— Athletics Federation of India (@afiindia) August 26, 2022
Top finish with 89.08m at Lausanne Diamond League 🔥
He is back and back with a bang!#IndianAthletics@Diamond_Leaguepic.twitter.com/0zTwDpjhyU
15 वर्षीय लिंथोई चनाम्बामने ऐतिहासिक ज्युदो सुवर्णपदक जिंकले
भारताच्या लिंथोई चनाम्बामने बोस्निया-हर्जेगोविना येथील साराजेव्हो येथे झालेल्या जागतिक कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटात पदक जिंकणारी लिंथोई ही देशातील पहिला खेळाडू ठरली. मणिपूरच्या 15 वर्षीय खेळाडूने महिलांच्या 57 किलो वजनी गटात ब्राझीलच्या बियान्का रेसला हरवून अव्वल स्थान पटकावले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) या युवा खेळाडूच्या कामगिरीची माहिती दिली. जुलैमध्ये लिंथोईने बँकॉकमध्ये आशियाई कॅडेट आणि ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप 2022 मध्ये 63 किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले होते.