नीरज चोप्राची ‘सुवर्णकमाई’; भालाफेकीत मिळवले सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:25 AM2018-07-19T03:25:35+5:302018-07-19T03:25:56+5:30
काही दिवसांपूर्वीच युवा धावपटू हिमा दास हिने जागतिक अॅथलेटिक्समध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविल्यानंतर बुधवारी युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच युवा धावपटू हिमा दास हिने जागतिक अॅथलेटिक्समध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविल्यानंतर बुधवारी युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. भारताच्या या स्टार अॅथलिटने फ्रान्स येथे सुरू असलेल्या सोटेव्हिल अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेत २०१२ साली लंडन आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या केशोर्न वालकोट याचाही समावेश होता.
जबरदस्त वर्चस्व राखलेल्या नीरजने या स्पर्धेत ८५.१७ मीटरची शानदार फेक करताना सुवर्णपदकावर कब्जा केला. नीरजच्या धडाक्यापुढे मालदोवाच्या अँड्रियन मारडेयर याला ८१.४८ मीटरच्या फेकीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. लिथुआनियाच्या एडिस मातुसेविसियस याने ७९.३१ मीटरची फेक करीत कांस्यपदकावर नाव कोरले. त्याचवेळी, माजी आॅलिम्पिक सुवर्ण विजेत्या त्रिनिदाद टोबॅगोच्या वालकोटची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. त्याला ७८.२६ मीटरसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.
पानीपतच्या २० वर्षीय नीरजने २०१६ साली जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत ८६.४८ मीटरची विश्वविक्रमी फेक करताना दिमाखात सुवर्णपदक पटकावले होते. त्या वेळी भारतीय अॅथलेटिक्समध्ये नीरजचाच दबदबा राहिला होता. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी झालेल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही नीरजने ‘सुवर्ण’फेक करीत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती. यानंतर दोहा येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेमध्ये नीरजला अपेक्षित कामगिरी करण्यात यश आले नव्हते. मात्र या वेळी त्याने ८७.४३ मीटरची फेक करताना राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. सध्याच्या काळात तो भारताचा सर्वोत्तम भालाफेकपटू आहे.
नीरज चोप्राच्या या शानदार कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनीही ट्विटरद्वारे नीरजचे कौतुक केले आहे. (वृत्तसंस्था)
>जबरदस्त कामगिरी केली नीरज. अशीच कामगिरी करीत राहा. या शानदार यशासाठी नीरज आणि त्याचे प्रशिक्षक उवे होन यांचे अभिनंदन. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या विनंतीनंतर नीरजला प्रशिक्षकासह फिनलँडला पाठविण्यास तयार झाल्याने ‘साई’ आणि भारत सरकारचे आभार.
- आदिल सुमारीवाला, अध्यक्ष - एएफआय