पुण्यातील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला नीरज चोप्राचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 09:00 AM2021-08-21T09:00:30+5:302021-08-21T09:00:47+5:30
Neeraj Chopra : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते येत्या सोमवारी हे नामकरण होईल. या वेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे व दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित राहणार आहेत.
पुणे : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या घोरपडी येथील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ मधील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे नाव देण्यात येणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते येत्या सोमवारी हे नामकरण होईल. या वेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे व दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या लष्कराच्या सोळा खेळाडूंचा गौरव संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे. ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये हे स्टेडियम २००६ साली उभारण्यात आले. या स्टेडियममध्ये ४00 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा सुभेदार असलेल्या नीरज चोप्राने या संस्थेत भालाफेकीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीच्या गौरवार्थ या संस्थेतील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ आता ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियम, पुणे कँटोन्मेंट’ म्हणून ओळखले जाणार असून तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण ‘ॲथलेटिक्स’ना प्रेरणा मिळणार आहे.