नेहरा, भुवनेश्वरने दिलेल्या टिप्सची मदत झाली : सरन
By Admin | Published: June 21, 2016 07:23 PM2016-06-21T19:23:59+5:302016-06-21T19:23:59+5:30
स्विंग गोलंदाजी करण्यासाठी अनुभवी आशीष नेहरा व भुवनेश्वर कुमार यांनी दिलेल्या टीप्सची मदत झाली
ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. 21 - स्विंग गोलंदाजी करण्यासाठी अनुभवी आशीष नेहरा व भुवनेश्वर कुमार यांनी दिलेल्या टीप्सची मदत झाली, अशी प्रतिक्रिया टी-२० मध्ये संस्मरणीय पदार्पण करणारा भारताचा युवा वेगवान गोलंदाज बरिंदर सरनने व्यक्त केली.
सरनने १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. पदार्पणाच्या लढतीत टी-२० आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सरनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेचा डाव ९ बाद ९९ धावांत रोकला आणि त्यानंतर १० गडी राखून सहज विजय मिळवला.
सरन म्हणाला,ह्यमला रिव्हर्स स्विंग व सीम पोझिशनबाबत आशीष नेहरा व भुवनेश्वर कुमार यांच्याकडून माहिती मिळाली. दडपणाला कसे सामोरे जाता, हे महत्त्वाचे असते. टी-२० मध्ये गोलंदाजाला प्रतिस्पर्धी फलंदाजाची शैली झटपट समजून घ्यावी लागते आणि वेग व टप्पा यामध्ये बदल करावा लागतो.
सरन पुढे म्हणाला, हे संस्मरणीय पदार्पण ठरले. पदार्पण संस्मरणी ठरावे, असे स्वप्न सर्वच बघत असतात. टी-२० मध्ये पदार्पणात माझी कामगिरी सर्वोत्तम ठरल्याचा अभिमान आहे.
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून भारतातर्फे टी-२० व वन-डे कॅप मिळाल्यामुळे सरनने आनंद व्यक्त केला.
सरन म्हणाला, माहीकडून वन-डे आंतररष्ट्रीय व टी-२० कॅप मिळणे मोठी बाब आहे. हे स्वप्न साकार झाल्याप्रमाणे आहे.
सुरुवातीला सरनला बॉक्सिंगची आवड होती, पण कारकिर्दीसाठी क्रिकेटची निवड केल्याचे त्याला दु:ख नाही.
सरन म्हणाला, बॉक्सिंगपेक्षा क्रिकेटची निवड करण्याचा निर्णय फार पूर्वीच घेतला. त्याचे मला कुठलेच दु:ख नाही. मी त्यानंतर बॉक्सिंगबाबत कधीच विचार केला नाही आणि हा योग्य निर्णय असल्याची प्रचिती आली. ज्यावेळी पंजाबतर्फे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, त्यावेळी माझा निवड योग्य असल्याचे वाटले. बॉक्सिंगचे क्षेत्र मर्यादित आहे. २३ वर्षीय वेगवान गोलंदाज आताही टीव्हीवर बॉक्सिंग बघतो. विशेषत: त्याला विजेंदरची व्यावसायिक बॉक्सिंग लढत बघायला आवडते.